31.1 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरविशेषफटाक्यांचे अनधिकृत स्टॉल,दादरच्या सुरक्षेशी खेळ!

फटाक्यांचे अनधिकृत स्टॉल,दादरच्या सुरक्षेशी खेळ!

१९९७ च्या आगीच्या दुर्घटनेतूनही प्रशासनाने घेतला नाही धडा

Google News Follow

मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण आणि लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन वर्दळीचे केंद्र असलेल्या दादरमध्ये सध्या अनधिकृत फेरीवाले आणि फटाक्यांच्या बेकायदेशीर स्टॉल्सचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी होणारी गर्दी, त्यात रस्त्यांवर थाटलेले फटाक्यांचे स्टॉल आणि पदपथांवर अतिक्रमण करणारे फेरीवाले यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, दादरमध्ये यापूर्वी फटाक्यांच्या स्टॉलला लागलेल्या भीषण आगीची घटना घडूनही प्रशासनाने त्यातून कोणताही धडा घेतला नसल्याचे चित्र दिसत आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिका आणि पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून होत आहे.

१९९७ मध्ये दादरच्या डिसिल्व्हा गल्लीतील फटाक्यांच्या एका स्टॉलला भीषण आग लागली होती. या आगीत सात ते आठ स्टॉल जळून खाक झाले होते. आगीची झळ थेट विसावा हॉटेलपर्यंत पोहोचली होती. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नव्हती. मात्र, दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते आणि मोठी गर्दी असलेल्या दादरमधील फटाक्यांच्या विक्रीचा धोका या घटनेने अधोरेखित केला होता. त्यानंतर अशा स्टॉलवर निर्बंध घालण्यात आले होते. असे असताना सध्या पुन्हा मुख्य रस्त्यांवर फटाक्यांचे स्टॉल उभे राहत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयीन आदेश आणि अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे का, याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.

दुसरीकडे, दादर रेल्वे स्थानकाचा परिसर फेरीवालामुक्त क्षेत्र म्हणून घोषित असतानाही स्टेशनच्या बाहेर पदपथ आणि रस्त्यांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गर्दीच्या वेळेत पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाही शिल्लक राहत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, स्टेशनच्या अगदी बाहेर पोलिसांची बीट चौकी असतानाही फेरीवाल्यांचे अतिक्रमण सुरूच असल्याने पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

गेल्या आठवड्यात दादरमध्ये पालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान फेरीवाल्यांनी कारवाईसाठी आलेली गाडी अडवल्याचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही फेरीवाल्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यावर मोर्चाही नेला. या प्रकारामुळे दादरमधील वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येते. अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करताना प्रशासनाला विरोध केला जात असल्याने अतिक्रमणाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

दरम्यान, दादरमधील अनधिकृत फेरीवाल्यांना ५० ते ८० हजार रुपये घेऊन बनावट क्यूआर कोड पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामागे काही दलाल आणि हप्ता वसुली करणारे घटक सक्रिय असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या कथित रॅकेटची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

एका बाजूला अनधिकृत फटाक्यांच्या स्टॉलमुळे आगीचा धोका, तर दुसऱ्या बाजूला फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा आणि गर्दीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिका आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवावी. अनधिकृत फटाक्यांच्या स्टॉलची तपासणी, स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवणे आणि कथित हप्ता वसुलीच्या आरोपांची चौकशी करणे आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड न करता दादरला अतिक्रमणमुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा