अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठेला दोन वर्षे पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही वर्षगाठ “आपल्या आस्था आणि संस्कारांचा एक दिव्य उत्सव” असल्याचे सांगितले. भगवान श्रीरामांच्या असीम कृपेने आणि आशीर्वादाने कोट्यवधी रामभक्तांचा पाचशे वर्षांचा संकल्प साकार झाल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज रामलल्ला आपल्या भव्य धामात पुनः विराजमान आहेत. यावर्षी अयोध्येची धर्मध्वजा आणि रामलल्ला प्रतिष्ठा द्वादशी या पावन क्षणांची साक्षीदार ठरत आहे. मागील महिन्यात या धर्मध्वजेच्या पुण्यस्थापनेचा योग लाभला, हे आपले सौभाग्य असल्याचेही त्यांनी सांगितले.
सोशल मीडिया मंच ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “अयोध्येच्या पावन भूमीवर आज रामलल्ला प्राण-प्रतिष्ठेची दुसरी वर्षगाठ साजरी होत आहे. या पवित्र प्रसंगी देश-विदेशातील सर्व रामभक्तांच्या वतीने प्रभू श्रीरामांच्या चरणी कोटी-कोटी नमन. समस्त देशवासियांना अनंत शुभेच्छा.”
दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, भगवान श्रीरामांच्या कृपेनेच हा ऐतिहासिक क्षण साकार झाला असून अयोध्येची धर्मध्वजा आणि प्रतिष्ठा द्वादशी यंदा विशेष महत्त्वाची आहे. पुढे ते म्हणाले, “मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची प्रेरणा प्रत्येक देशवासीयाच्या हृदयात सेवा, समर्पण आणि करुणेची भावना अधिक दृढ करो. तीच भावना समृद्ध व आत्मनिर्भर भारताचा मजबूत पाया ठरेल. जय सियाराम.”
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ‘एक्स’वर शुभेच्छा व्यक्त करताना लिहिले, “जय श्रीराम. आजच्याच शुभ तिथीला दोन वर्षांपूर्वी पाचशे वर्षांची प्रतीक्षा संपली आणि मोदीजींच्या हस्ते श्रीराम जन्मभूमी मंदिरात रामलल्लाची प्राण-प्रतिष्ठा झाली. या दुसऱ्या वर्षगाठीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.”
अमित शाह पुढे म्हणाले की, प्रभू श्रीरामांचे आदर्श आणि जीवनमूल्ये पुन्हा अधोरेखित करणारे हे मंदिर धर्मरक्षणासाठीचा संघर्ष, सांस्कृतिक स्वाभिमानासाठीचा त्याग आणि वारसा जपण्याच्या बलिदानाची अनुपम प्रेरणा ठरेल. या पवित्र प्रसंगी श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील सर्व बलिदान्यांना त्यांनी नमन केले.







