टी२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील पंधरा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला असून, शुभमन गिल यांना संघातून वगळण्यात आले आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पत्रकार परिषदेत टी२० विश्वचषक २०२६ सोबतच न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पाच टी२० सामन्यांच्या मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे, न्यूझीलंड मालिकेसाठीही हाच संघ खेळणार आहे. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजीत अगरकर उपस्थित होते.
टी२० फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ निराशाजनक कामगिरीमुळे शुभमन गिल यांना संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्या जागी अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संघात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संजू सॅमसन यांना संधी देण्यात आली असून, ते अभिषेक शर्मा यांच्यासोबत डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. दुसरे यष्टीरक्षक म्हणून ईशान किशन यांचा समावेश करण्यात आला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील दमदार फलंदाजीचे फळ म्हणून किशन यांची दीर्घ काळानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. या स्पर्धेत किशन हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले होते.
मधल्या फळीत तिलक वर्मा यांचा समावेश कायम ठेवण्यात आला असून, रिंकू सिंग यांचीही दीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे.
अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेल यांच्यासह हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संधी देण्यात आली आहे. गोलंदाजी विभागात वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव हे दोन प्रमुख फिरकीपटू असतील.
वेगवान गोलंदाजांच्या फळीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला आहे.
टी२० विश्वचषक २०२६ चे आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार असून, स्पर्धेला ७ फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे.
टी२० विश्वचषक २०२६ व न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), जसप्रीत बुमराह, अभिषेक शर्मा, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल (उपकर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग







