जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड भागात कांडवाजवळ गुरुवारी (७ ऑगस्ट) सीआरपीएफच्या वाहनाचा अपघात झाला. सीआरपीएफ जवानांचे वाहन दरीत कोसळल्यामुळे दोन जवान हुतात्मा झाले तर १५ हून अधिक जवान जखमी झाल्याची माहिती आहे. उधमपूरचे अतिरिक्त एसपी संदीप भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचाव कार्य सुरू केले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी एकस्वर पोस्टकरत या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. “उधमपूर: कांडवा-बसंतगड परिसरात सीआरपीएफच्या वाहनाला झालेल्या अपघाताची बातमी ऐकून अस्वस्थ झालो. त्या वाहनात सीआरपीएफचे अनेक शूर जवान होते,” असे त्यांनी लिहिले.
मंत्री सिंह यांनी सांगितले कि, परिस्थितीवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवून असणाऱ्या उपायुक्त सलोनी राय यांच्याशी बोलणे झाले आहे. “बचाव उपाययोजना तात्काळ सुरू करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोक स्वेच्छेने मदतीसाठी पुढे आले आहेत. सर्व शक्य मदत सुनिश्चित केली जात आहे,” ते पुढे म्हणाले.
सीआरपीएफने माहिती दिली की, ऑपरेशन संपल्यानंतर १८७ बटालियनचे बंकर वाहन १८ सैनिकांसह कडवाहून बसंतगडला जात होते. दरम्यान, उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड तहसीलमधील लोध्रा येथे वाहन अपघातग्रस्त होऊन खड्ड्यात पडले. गुरुवारी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला, ज्यामध्ये वाहनात उपस्थित असलेले सर्व सैनिक जखमी झाले. सर्व जखमी सैनिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सीआरपीएफचे दोन जवान गंभीर जखमी झाले होते, ज्यांचा नंतर मृत्यू झाला.
जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही दुःख व्यक्त केले. त्यांनी एक्सवर लिहिले की, “उधमपूरजवळ झालेल्या अपघातात सीआरपीएफ जवानांच्या मृत्युमुळे दुःख झाले आहे. राष्ट्रासाठी त्यांची अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सर्वोत्तम शक्य ती काळजी आणि मदत सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.”







