उत्तर प्रदेशमध्ये जीर्णावस्थेत गेलेल्या ऐतिहासिक वारशाला पुन्हा नवजीवन देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. पर्यटन विभागाने राज्यातील ११ जुन्या किल्ल्यांचे आणि इमारतींचे पुनरुज्जीवन करून त्यांना पर्यटन केंद्र बनवण्याचा संकल्प केला आहे. हे काम पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) तत्वावर केले जाणार असून, एजन्सी या जागांची रचना करेल, त्यांचे बांधकाम, वित्तनियोजन, व्यवस्थापन करेल आणि कालांतराने सरकारकडे परत सोपवेल.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार सुरू होणारी ही योजना केवळ ऐतिहासिक वास्तूंना पुनर्जीवित करणार नाही, तर स्थानिक पर्यटन वाढवेल आणि हजारोंना थेट वा अप्रत्यक्ष रोजगारही मिळवून देईल. पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, या ११ ऐतिहासिक स्थळांमध्ये खालील समाविष्ट आहेत: ललितपूर – तालबेहट किल्ला, बांदा – रनगड आणि भुरागड किल्ला, गोंडा – वज़ीरगंज बारादरी, लखनऊ – आलमबाग भवन, गुलिस्तान-ए-एरम आणि दर्शन विलास, कानपूर – टिकैत राय बारादरी, महोबा – मस्तानी महाल आणि सेनापती महाल, झांसी – तहरोली किल्ला, मथुरा – सीताराम महाल (कोटवान किल्ला).
हेही वाचा..
टीसीएस आणि भारती एअरटेलचं मार्केट किती घटलं ?
ममता बॅनर्जी यांची बंगालला ‘मिनी पाकिस्तान’ बनवण्याची तयारी
भारत आणि आइसलँडमध्ये सकारात्मक ऊर्जेची समान भावना
आर्थर रोड जेलमध्ये गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला
या सर्व ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकला आणि समृद्ध इतिहास आहे. या इमारतींचं हॉटेल्स, सांस्कृतिक केंद्र किंवा संग्रहालयांमध्ये रूपांतर केलं जाणार आहे जेणेकरून पर्यटकांना या स्थळांवर थांबण्याचा अनुभव मिळेल आणि इतिहासाशी जवळून संवाद साधता येईल. बुंदेलखंडसारख्या मागास भागात ही योजना विशेष फायदेशीर ठरेल, कारण पर्यटन वाढल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.
पर्यटन विभागाच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पामुळे केवळ वास्तूंचं रूपांतर होणार नाही, तर स्थानिक रहिवाशांना रोजगाराच्या नव्या संधीही उपलब्ध होतील. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही इको-टूरिझम आणि धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामुळे उत्तर प्रदेश हळूहळू देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे. अयोध्या, काशी आणि मथुरा या पवित्र ठिकाणांबरोबरच राज्यातील इतर प्राचीन मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांना जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. २०२४ मध्ये ६५ कोटी पर्यटकांनी उत्तर प्रदेशातील विविध स्थळांना भेट दिली, जे या योजनेच्या यशस्वितेचं द्योतक आहे.







