राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी (९ जुलै) जॅग्वार लढाऊ विमान कोसळल्याने भारतीय हवाई दलाच्या (IAF) दोन वैमानिकांचा मृत्यू झाला, गेल्या पाच महिन्यांतील ही तिसरी घटना आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, विमानाचे अवशेष पायलटच्या मृतदेहासह एका शेतात आढळले. मृतदेह गंभीरपणे खराब झालेल्या अवस्थेत होते.
तहसील रतनगढजवळील भानोदा गावातील सूरतगडह हवाई दलाच्या तळातून दोन-सीटर ट्रेनर जॅग्वार (SEPECAT Jaguar) लढाऊ विमानाने उड्डाण भरले होते. हे प्रशिक्षण उड्डाण होते आणि याच दरम्यान अपघात झाला. दुपारी सुमारे १:२५ वाजताच्या आसपास ही घटना घडली.
घटनेनंतर लगेचच परिसरात घबराट पसरली. गावकऱ्यांनी आकाशातून मोठा आवाज ऐकला, त्यानंतर शेतातून ज्वाळा आणि धूर निघत असल्याचे सांगितले. स्थानिक रहिवाशांनी असेही सांगितले की अपघातामुळे जवळच्या शेतात आग लागली होती, जी त्यांनी स्वतः विझवण्याचा प्रयत्न केला.
घटनेनंतर जिल्हाधिकारी अभिषेक सुराणा आणि पोलिस पथके घटनास्थळी दाखल झाली. परिसर सुरक्षित करण्यासाठी आणि तपास सुरू करण्यासाठी लष्कराचे बचाव पथकही घटनास्थळी पोहोचण्याची अपेक्षा आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यानंतर लष्कराकडून अधिकृत निवेदन जारी केले जाण्याची अपेक्षा आहे. स्थानिक पोलिस अधिकारी राजलदेसर कमलेश यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, दुपारी १.२५ वाजता भानोदा गावातील शेतात हे विमान कोसळले. अपघातस्थळाजवळ मानवी शरीराचे अवयव आढळले.
हे ही वाचा :
राजस्थानमधील कन्हैय्यालाल हत्याप्रकरणावरील ‘उदयपूर फाइल्स’ला स्थगितीस नकार
मॉलमध्ये काम करायचे असेल तर मुस्लिम हो, म्हणणाऱ्या फराझला अटक
मैदानावरचा मराठा, जो भेदरला नाही, झुकलाही नाही!
दरम्यान, आजची राजस्थानमधील घटना ही तिसरी घटना आहे. यापूर्वी मार्चमध्ये हरियाणात आणि एप्रिलमध्ये गुजरातमध्ये जॅग्वार अपघाताची घटना घडली होती. यासह फेब्रुवारीत एक ‘मिराज–२०००’ विमान अपघाताची घटना घडली होती. दरम्यान, २०२५ मध्ये आतापर्यंत ५ लढाऊ विमानांचे अपघात झाले असून, यापैकी ३ जॅग्वार अपघात आहेत.







