जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरमधून मोठी बातमी आली आहे. २२ एप्रिल रोजी श्रीनगरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेराव घालून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी (२८ जुलै) सकाळी श्रीनगरच्या लिडवास परिसरातील महादेव पर्वताजवळ चकमक सुरू झाली. यामध्ये तीन संशयित दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. दहशतवाद्यांकडून अनेक ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाइंड असलेला सुलेमान मुसा यात मारला गेल्याचे म्हटले जात आहे मात्र अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोमवारी (२८ जुलै) सकाळी श्रीनगरच्या लिडवास भागात भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन महादेव’ अंतर्गत सुरक्षा कर्मचारी आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्यांना या भागात काही दहशतवादी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर, लष्कराच्या अनेक पथकांना त्या भागात पाठवण्यात आले. सकाळी ११.३० च्या सुमारास, २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पीएआरए यांचा समावेश असलेल्या एका पथकाने तीन दहशतवाद्यांना शोधून काढले आणि त्यांचा खात्मा केला. अबू हमजा, सुलेमान आणि यासिर अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. दरम्यान, चकमकीची माहिती मिळताच परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि सध्या ऑपरेशन सुरू आहे.
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात “ऑपरेशन सिंदूर” वर चर्चा होणार असताना ही घटना उघडकीस आली आहे. सरकार आज संसदेत दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करत आहे.
हे ही वाचा :
कर्नल सोफिया यांच्यावरील टीका प्रकरण : ‘त्या’ मंत्र्याला सुप्रीम कोर्टाने झाडले
गाझा पट्टीमधील भूकबळीबद्दल ट्रम्प यांची खंत
छत्तीसगढमध्ये ‘जबरदस्तीने धर्मांतर’-‘मानवी तस्करी’चा आरोप, दोन ननसह तिघांना अटक!
अवसानेश्वर मंदिर दुर्घटना : मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत
या वर्षी २२ एप्रिल रोजी लष्कर-ए-तैयबाच्या ‘द रेझिस्टन्स फोर्स’च्या दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन मैदानावर हल्ला केला, ज्यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फोर्सच्या या हल्ल्यानंतर, भारताने प्रत्युत्तर दिले आणि पाकिस्तानमध्ये उघडपणे वाढणाऱ्या ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.







