भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये त्याने शतक झळकावत आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आंध्र प्रदेशविरुद्ध खेळताना कोहलीने लिस्ट क्रिकेटमध्ये १६,००० धावा पूर्ण केल्या.
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड-१ येथे झालेल्या या सामन्यात दिल्लीकडून खेळताना विराट कोहलीने १०१ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १३१ धावांची शानदार खेळी केली. कोहलीच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली संघाने ४ विकेट्सनी विजय मिळवला.
१६,००० लिस्ट-ए धावांचा टप्पा गाठणारा विराट कोहली हा सचिन तेंडुलकर यांच्यानंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशेष म्हणजे, हा विक्रम गाठणारा तो जगातील नववा फलंदाज असून या यादीत रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि सर विवियन रिचर्ड्स यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
कोहलीने या सामन्यात प्रियांश आर्यसोबत दुसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर नितीश राणासोबत तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांचा मजबूत पाया रचला. प्रियांश आर्यने ४४ चेंडूंमध्ये ५ षटकार व ७ चौकारांसह ७४ धावा केल्या, तर नितीश राणाने ५५ चेंडूंमध्ये ७७ धावांची खेळी केली. दिल्ली संघाने ३७.४ षटकांतच लक्ष्य गाठत सामना जिंकला.
याआधी, नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या आंध्र प्रदेश संघाने ५० षटकांत ८ विकेट्स गमावत २९८ धावा केल्या. रिकी भुईने १०५ चेंडूंमध्ये १२२ धावांची शतकी खेळी केली. दिल्लीकडून सिमरजीत सिंगने ५ विकेट्स घेतल्या, तर प्रिन्स यादवने ३ बळी मिळवले.
विजय हजारे ट्रॉफीतील ही खेळी विराट कोहलीच्या अनुभव, सातत्य आणि जबरदस्त फॉर्मची पुन्हा एकदा साक्ष देणारी ठरली आहे.







