सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनस्थळावरून हलवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी शनिवारी (१८ जुलै) स्वतः आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली. तसेच २० जुलै रोजी संसदेकडे काढण्यात येणारा मोर्चा नियोजित वेळेनुसारच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जंतर-मंतर येथे माध्यमांशी संवाद साधताना अभिजीत दिपके म्हणाले, “आजपासून मी आमरण उपोषण सुरू करत आहे. कोणालाही मागे हटायचे नाही. हे आंदोलन आता आणखी मोठे होणार आहे. सरकारने मोठी चूक केली आहे. सर्वांनी मोठ्या संख्येने जंतर-मंतरवर यावे. येथूनच आमचे आंदोलन सुरू राहील आणि २० जुलैचा मोर्चाही नियोजितप्रमाणेच निघेल.”
सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुट प्रकरण, परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करत होते. मात्र, प्रकृती खालावल्याने शनिवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी ही कारवाई दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्याचे सांगितले आहे.
वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटविल्यानंतर जंतर-मंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर जबरदस्ती केल्याचा आणि आंदोलन दडपण्याचा आरोप केला. काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की व लाठीमार झाल्याचाही दावा केला आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळत संपूर्ण कारवाई वांगचुक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक होती आणि ती कायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनच करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
हे ही वाचा:
इराणमध्ये अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांत ३८ ठार; ४०० हून अधिक जखमी
दिल्ली पोलिसांनी वांगचुक यांना उचलून नेले रुग्णालयात
‘भारत माता नाही, आरएसएस माता’ म्हणणाऱ्याला टीव्ही चर्चेदरम्यानच चपलेने मारले
दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या उपोषणाच्या घोषणेमुळे आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. CJP ने आंदोलन मागे घेण्यास स्पष्ट नकार देत, वांगचुक रुग्णालयात असले तरी आंदोलन सुरूच राहील आणि २० जुलै रोजी संसदेकडे प्रस्तावित मोर्चा कोणत्याही परिस्थितीत काढला जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. या घडामोडींमुळे जंतर-मंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
