वीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीतील अगस्ता वेस्टलँड घोटाळ्यातील प्रमुख बिचौल्या क्रिश्चियन मिशेल याला राऊज अॅव्हेन्यू कोर्टाने मोठा झटका दिला आहे. जेलमधून मुक्त करण्यासाठी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली असून मिशेल सध्या देखील तिहार तुरुंगातच राहणार आहे.
कोर्टाने स्पष्ट केले की, क्रिश्चियन मिशेलवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 467 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये आजन्म कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे मिशेलने आता पर्यंत जी शिक्षा भोगली आहे ती पुरेशी असल्याचं मानता येणार नाही.
कलम 467 (खोटी कागदपत्रं बनवणे) लागू होतं की नाही, हे मुद्दे आरोप निश्चित करताना ठरवले जातील, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे सध्या त्याची रिहाई शक्य नाही.
ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) दोन्ही संस्थांनी मिशेलच्या याचिकेला विरोध केला. मिशेलने असा दावा केला होता की, त्याच्यावर असलेले आरोप ज्या गुन्ह्यांशी संबंधित आहेत, त्यासाठी कमाल सजा ७ वर्षांचीच आहे आणि तो तो कालावधी आधीच तुरुंगात घालवून बसला आहे.
याच वर्षी १८ फेब्रुवारी रोजी, सुप्रीम कोर्टाने सीबीआय प्रकरणात मिशेलला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ईडी प्रकरणातही जामीन दिला. मात्र, जामीन अटींनुसार ५ लाख रुपयांचा वैयक्तिक हमीदार, पासपोर्ट कोर्टात जमा करणे, आणि भारतातील वास्तव्याची माहिती देणे बंधनकारक होते.
मिशेलने या अटींविरोधात पुन्हा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला, पण तेथूनही त्याला दिलासा मिळाला नाही.
क्रिश्चियन मिशेल याला ५ डिसेंबर २०१८ रोजी युएई (UAE) मधून भारतात प्रत्यर्पित करण्यात आले होते. दिल्ली पोहोचताच सीबीआयने त्याला अटक केली, आणि काही दिवसांतच ईडीनेही ताब्यात घेतलं. तेव्हापासून तो तिहार जेलमध्ये बंदिस्त आहे.







