एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर दुसरा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे. त्यानंतर तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे. हा दुसरा ब्लॅक बॉक्स म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) होय, जो विमानाच्या कॉकपिटमधील सर्व आवाज रेकॉर्ड करतो. यामध्ये पायलट्समधील संभाषण, रेडिओ कम्युनिकेशन, अलार्म्सचे आवाज आणि अपघाताच्या काही क्षणांआधीचे पार्श्वभूमीतील आवाज यांचा समावेश असतो.
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) हे अपघाताच्या तपासासाठी अतिशय महत्त्वाचे साधन मानले जाते. यातून चालक दलाच्या निर्णय प्रक्रियेचा मागोवा घेता येतो, मानवी चुकांचा किंवा यांत्रिक इशाऱ्यांचा शोध घेता येतो, तसेच घटनेचा तपशीलवार क्रम समजून घेण्यास मदत होते. विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, CVR आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) यांचे विश्लेषण सुरू आहे. CVR मधून मिळणाऱ्या पायलट्सच्या संभाषणातील माहिती व कॉकपिटमधील आवाजांमुळे अपघाताची कारणे व घटनांचा क्रम स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा..
पंतप्रधानांचा सायप्रस दौरा परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
मध्य प्रदेशमध्ये वाढत आहेत कोरोना रुग्ण
अहमदाबाद विमान अपघात : आतापर्यंत ८७ जणांचे डीएनए नमुने जुळले
रूपाणी यांच्या निधनानंतर राज्यात दुखवटा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांनीही या ब्लॅक बॉक्सच्या सापडल्याची पुष्टी केली. रविवारी त्यांनी अहमदाबाद दौरा केला होता आणि या दरम्यान त्यांनी चौकशी प्रक्रियेचा आढावा घेतला तसेच सिव्हिल रुग्णालयात जाऊन जखमींना भेट दिली. अधिकार्यांनी सांगितले की, मेघाणी नगर येथे झालेल्या या भीषण विमान अपघातात मृतांची संख्या २७० झाली आहे. त्यामध्ये अपघातग्रस्त विमानातील २४१ प्रवासी, तसेच आजूबाजूच्या हॉस्टेल्स, मेस हॉल आणि निवासी भागात असलेल्या काही अन्य लोकांचा समावेश आहे.
दरम्यान, गुजरात सरकारने माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व शासकीय कार्यक्रम स्थगित ठेवण्यात येणार असून, सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.







