भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आपला पहिला एकदिवसीय (वनडे) विश्वचषक जिंकत इतिहास रचला. या विश्वविजेत्या संघाची सदस्य श्री चरणी हिला बुधवारी आंध्र प्रदेश सरकारकडून सन्मानित करण्यात आले.
आंध्र प्रदेशचे शिक्षण व आयटी मंत्री नारा लोकेश यांनी उंडावल्ली येथील चरणीच्या निवासस्थानी भेट देत सरकारकडून ₹२.५ कोटींचा धनादेश प्रदान केला. रोख बक्षिसासोबतच, सरकारने विशाखापट्टणम येथे ५०० चौरस यार्डचा निवासी प्लॉट देण्याचीही घोषणा केली आहे. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारकडून नोकरी देण्याचे आश्वासनही देण्यात आले असून, त्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.
सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, हा निर्णय राज्यात क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीला प्रोत्साहन देण्याची आणि आंध्र प्रदेशातील तरुणींना आत्मविश्वासाने क्रीडाक्षेत्रात करिअर घडवण्यासाठी प्रेरित करण्याची सरकारची बांधिलकी दर्शवतो. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी विश्वचषकानंतर चरणीची भेट घेताना या पुरस्कारांची घोषणा केली होती.
या कार्यक्रमाला परिवहन व क्रीडामंत्री मंडीपल्ली रामप्रसाद रेड्डी, आंध्र प्रदेश स्पोर्ट्स अथॉरिटीचे अध्यक्ष अनिमिनी रविनायुडू, विशेष मुख्य सचिव (क्रीडा) अजय जैन यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कडप्पा जिल्ह्याची रहिवासी असलेल्या श्री चरणी हिने भारतीय संघाला महिला विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. डावखुरी फिरकी गोलंदाज असलेल्या चरणीने ९ सामन्यांत १४ विकेट्स घेतल्या आणि स्पर्धेतील चौथी सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरली.
२१ वर्षांच्या चरणीने एप्रिल २०२५ मध्ये भारतीय संघाकडून पदार्पण केले होते. तिच्या प्रभावी कामगिरीमुळे तिला विश्वचषक संघात संधी देण्यात आली आणि तिने आपल्या शानदार प्रदर्शनाने संघ व्यवस्थापनाचा निर्णय योग्य ठरवला.
आतापर्यंत १८ वनडे सामन्यांत २३ विकेट्स आणि ५ टी-२० सामन्यांत १० विकेट्स घेणारी चरणी आता भारतीय महिला क्रिकेट संघाची उदयोन्मुख स्टार म्हणून ओळखली जात आहे.







