टेक दिग्गज मेटाने अरुण श्रीनिवास यांची भारतातील ऑपरेशन्ससाठी व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. अरुण श्रीनिवास हे मेटामध्ये संध्या देवनाथन यांची जागा घेतील, ज्यांना अलीकडेच कंपनीने भारत आणि दक्षिण-पूर्व आशियाचा प्रमुख नियुक्त केले आहे. मेटाने एका निवेदनात सांगितले, “आम्ही अरुण श्रीनिवास यांची भारतातील मेटाचे व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून नियुक्ती करत आहोत.
या नव्या भूमिकेत श्रीनिवास कंपनीच्या व्यवसाय, नवप्रवर्तन आणि उत्पन्नवाढीच्या प्राधान्यांना एकत्र आणण्यावर लक्ष केंद्रित करतील. ते मेटाच्या व्यवसायाच्या दीर्घकालीन वाढीस चालना देतील आणि भारतावरील कंपनीच्या बांधिलकीस पाठिंबा देत राहतील. मेटाने सांगितले की, श्रीनिवास भारत चार्टरचे नेतृत्व करतील आणि देशातील आघाडीच्या ब्रँड्स, जाहिरातदार, विकसक (डेव्हलपर्स) आणि भागीदारांसोबतचे रणनीतिक संबंध अधिक दृढ करतील, ज्यामुळे भारत हा एक बाजार म्हणून अधिक सक्षम होईल.
हेही वाचा..
पंतप्रधान मोदींचा सायप्रसमध्ये बिझनेस राउंडटेबल इव्हेंटमध्ये सहभाग
अहमदाबाद विमान अपघात : दुसरा ब्लॅक बॉक्सही सापडला
पंतप्रधानांचा सायप्रस दौरा परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
मध्य प्रदेशमध्ये वाढत आहेत कोरोना रुग्ण
ते १ जुलै २०२५ पासून आपल्या नवीन पदभारात रूजू होतील आणि संध्या देवनाथन यांना रिपोर्ट करतील. मेटाच्या उपाध्यक्षा (भारत आणि दक्षिण-पूर्व आशिया) संध्या देवनाथन म्हणाल्या, “भारत मेटा AI चा स्वीकार, व्हॉट्सअॅप वापर आणि रील्सच्या बाबतीत आघाडीवर आहे. उत्तम कार्यसंघ घडवणे, उत्पादन नवप्रवर्तन पुढे नेणे आणि मजबूत भागीदारी साधणे – या सगळ्यांत अरुण यांचा प्रभावी ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यामुळेच ते भारतात मेटाच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीसाठी योग्य नेतृत्व ठरतात.
IIM कोलकाता येथून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या श्रीनिवास यांना हिंदुस्तान युनिलिव्हर, रीबॉक, ओला आणि वेस्टब्रिज कॅपिटल यांसारख्या कंपन्यांमध्ये विक्री आणि विपणन नेतृत्वाच्या भूमिकांचा जवळपास तीन दशकांचा अनुभव आहे. सध्या श्रीनिवास मेटामध्ये भारताच्या जाहिरात व्यवसायाचे संचालक आणि प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. २०२० मध्ये मेटामध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी देशातील प्रमुख जाहिरातदार आणि एजन्सी भागीदारांसोबत मेटाचे कार्य यशस्वीरित्या पुढे नेले आहे.







