भारतीय संघाने आशिया कप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (पीसीबी) प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि पाकिस्तानमध्ये सरकारी मंत्री म्हणून नक्वी यांची दुहेरी भूमिका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, यानंतर बीसीसीआयने नक्वी यांच्यावर टीकास्त्र डागत स्पर्धेची ट्रॉफी घेऊन पळून गेल्याचा आरोप केला आहे.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसिन नक्वी यांच्यावर टीका केली आहे. आशिया कपमधील भारत- पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय संघाने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी पारंपारिक हस्तांदोलन नाकारून आपली भूमिका कायम ठेवली. तसेच पीसीबीचे प्रमुख आणि पाकिस्तानमध्ये मंत्री म्हणून काम करणारे एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आशिया कप ट्रॉफी समारंभात एसीसी प्रमुख मोहसिन नक्वी यांच्या वर्तनावर टीका केली. भारताने ट्रॉफी स्वीकारण्यास का नकार दिला हे स्पष्ट केले आणि या घटनेचा औपचारिक निषेध करण्याचे आश्वासन दिले.
हे ही वाचा:
आशिया कप: भारताच्या विजयानंतर मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची करून दिली आठवण
भारताचे ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन ‘तिलक’
कंप्यूटर आणि मोबाईलमुळे वाढतेय सर्व्हायकल पेनची समस्या
“भारत एका देशाविरुद्ध युद्ध लढत आहे. आपल्या देशाविरुद्ध युद्ध करणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून आम्ही ट्रॉफी स्वीकारू शकत नाही. म्हणून आम्ही ती ट्रॉफी घेण्यास नकार दिला आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की तो गृहस्थ आपल्या देशाला देण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्याच्या स्वतःच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे. त्यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध नोंदवणार आहोत,” असे सैकिया यांनी सांगितले. आम्ही एसीसी अध्यक्षांकडून आशिया कप २०२५ ट्रॉफी न घेण्याचा निर्णय घेतला आहे, जे पाकिस्तानच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. म्हणून आम्ही त्यांच्याकडून ती न घेण्याचा निर्णय घेतला. पण याचा अर्थ असा नाही की ते गृहस्थ पदकांसह ट्रॉफी घेऊन जातील. त्यामुळे हे खूप दुर्दैवी आणि क्रीडाप्रेमींसारखे नाही आणि आम्हाला आशा आहे की ट्रॉफी आणि पदके लवकरात लवकर भारतात परत केली जातील, असे ते पुढे म्हणाले.







