पंजाबमधील जालंधर येथील न्यायालयाने बलात्कार प्रकरणात पाद्री बजिंदर सिंग यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बजिंदर सिंगला मोहाली न्यायालयाने नुकतेच बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले होते. या प्रकरणी आज (१ एप्रिल) सुनावणी पार पडली आणि न्यायालयाने बजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुनावणीनंतर त्याला पटियाला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
ही बलात्काराची घटना २०१८ सालची आहे. या प्रकरणी महिलेने झिरकपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तक्रारीच्या आधारे बजिंदर सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार महिलेने आरोप केला होता की, बजिंदर सिंगने तिला परदेशात नेण्याचे आमिष दाखवले आणि मोहालीच्या सेक्टर ६३ येथील त्याच्या निवासस्थानी नेवून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओही बनवला.
तिने आरोप केला होता की, आरोपीने त्याच्या मागण्या मान्य न केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर २०१८ मध्ये दिल्ली विमानतळावरून बजिंदर सिंगला अटक करण्यात आली. तथापि, बजिंदरला जामिनावर तुरुंगातून सोडण्यात आले. बलात्कार प्रकरणात अखेर त्याला न्यायालयाने जन्म ठेपेची शिक्षा सुनावली आहे.
हे ही वाचा :
देशातील नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या झाली अर्धी
दोन मालगाड्या आदळल्या; दोन्ही गाड्यांचे लोको पायलट गतप्राण!
मोहम्मद युनूस यांचा फुत्कार, म्हणे बांगलादेशच महासागराचा रक्षक
दरम्यान, बजिंदर सिंगविरुद्ध आणखी दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. यापैकी एक तक्रार कपूरथळा पोलिसांनी आणि दुसरी मोहाली पोलिसांनी दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी, बजिंदर सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एका महिलेशी वाद घालत तिला मारहाण करताना दिसत होता.







