देशातील पहिल्या सुपरसॉनिक जेटच्या एका युगाचा अंत झाला असून सहा दशकांहून अधिक काळ सेवा बजावणाऱ्या मिग- २१ विमानाला २६ सप्टेंबर रोजी निरोप देण्यात आला. या समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वरिष्ठ लष्करी नेते, माजी सैनिक आणि कुटुंबे यांनी उपस्थिती लावली. भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनीही गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या मिग- २१ लढाऊ विमानाच्या निरोप समारंभाला उपस्थिती लावली. अंतराळवीर म्हणून निवड होण्यापूर्वी हवाई दलात पायलट म्हणून सुरुवातीच्या काळात मिग- २१ उडवणारे शुक्ला यांनी हे विमान त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले.
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला म्हणाले की, “मला मिग- २१ कायमचे लक्षात राहील. तुम्ही उडवलेल्या विमानासोबत तुमचे आयुष्य पुढे जात असते. माझ्यासाठी, विमानासोबतच्या माझ्या प्रगतीचा हा एक वैयक्तिक प्रवास आहे, म्हणून या प्रतिष्ठित विमानाला निरोप देताना मला येथे येऊन खूप आनंद होत आहे,” असे ते म्हणाले.
१९६० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय हवाई दलात समाविष्ट झालेले मिग-२१ हे भारताचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान होते. या विमानाने १९७१ च्या युद्धासह अनेक संघर्षांमध्ये निर्णायक भूमिका बजावली. जबरदस्त कामगिरीमुळे, हे विमान अनेक दशकांपासून भारताच्या लढाऊ ताफ्याचा कणा बनले. चंदीगडमध्ये एका भव्य निरोप समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या लढाऊ विमानाला ६२ वर्षांच्या विशिष्ट सेवेच्या समाप्ती निमित्त निरोप देण्यात आला. निरोप समारंभात मिग- २१, जग्वार आणि सूर्यकिरण विमानांनी शानदार उड्डाणे सादर केली.
हे ही वाचा:
न्यूयॉर्कमध्ये झळकतायत “Remember October 7” लिहिलेले होर्डिंग्ज! नेमके प्रकरण काय?
गौरवशाली अध्यायाचा अंत: ६२ वर्षांच्या सेवेनंतर लढाऊ मिग- २१ विमानांना निरोप
पाकची नाचक्की; ट्रम्पनी शरीफ, मुनीरना गेटबाहेर ठेवले ताटकळत
सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि लडाख समोरील खरा प्रश्न..!
१९६३ मध्ये सामील झालेल्या मिग- २१ ने अनेक संघर्षांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी शत्रूच्या ठिकाणांवर हल्ले केले, तर १९७१ मध्ये ढाका गव्हर्नर हाऊसवर केलेल्या बॉम्बहल्ल्याने युद्धाची गती भारताच्या बाजूने झाली. दशकांनंतर, २०१९ च्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर, मिग- २१ ने पुन्हा एकदा पाकिस्तानी एफ- १६ पाडून आपली ताकद सिद्ध केली. अलीकडच्या ऑपरेशन सिंदूरमध्येही प्रभावी भूमिका बजावली होती.







