बंगालमधील सरकार बदलल्यामुळे तस्लिमा नसरिन १९ वर्षांनी कोलकात्यात येणार

१ ऑगस्टला मूलतत्त्ववादविरोधी कार्यक्रमात सहभागी होणार

बंगालमधील सरकार बदलल्यामुळे तस्लिमा नसरिन १९ वर्षांनी कोलकात्यात येणार

बांगलादेशच्या निर्वासित लेखिका आणि मानवाधिकार कार्यकर्त्या तस्लीमा नसरीन तब्बल १९ वर्षांनंतर कोलकात्यात परतणार आहेत. त्यांच्या लिखाणाविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनांनंतर २००७ मध्ये त्यांना शहर सोडावे लागले होते. ६३ वर्षीय तस्लीमा नसरीन यांना त्यांच्या आत्मचरित्रात्मक ‘द्विखंडित’ या पुस्तकावर धर्मनिंदेचे आरोप झाल्यानंतर कोलकात्यातून निघून जावे लागले होते. त्यावेळी डाव्या आघाडीच्या सरकारने या पुस्तकावर बंदी घातली होती.

२००४ ते २००७ या काळात त्या कोलकात्यात वास्तव्यास होत्या. सध्या त्या दीर्घकालीन निवासी परवान्यावर दिल्लीमध्ये राहतात. आता १ ऑगस्ट रोजी रवींद्र सदन येथे आयोजित मूलतत्त्ववादविरोधी कार्यक्रमात त्या सहभागी होणार आहेत. २००७ नंतरचा हा त्यांचा कोलकात्यातील पहिलाच दौरा असून तीन संस्थांच्या संयुक्त निमंत्रणावरून त्या शहरात येत आहेत.

कार्यक्रम आयोजकांच्या माहितीनुसार, तस्लीमा नसरीन यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असून त्या आपल्या काही कविता सादर करतील आणि चर्चासत्रातही सहभागी होतील. बांगलादेश सरकारने एकेकाळी इस्लामची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, राज्याचे अर्थमंत्री स्वपन दासगुप्ता तसेच ज्येष्ठ साहित्यिक शिर्षेंदू मुखोपाध्याय उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तस्लीमा नसरीन यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरणही तापले आहे.

हे ही वाचा:

पीओके आंदोलनात लष्कर, जैशच्या दहशतवाद्यांना घुसवण्याचा कट?

मुंबईमधील कोस्टल रोडच्या बोगद्यात धावत्या कारला आग

बनावट सोन्याच्या विटा देऊन दागिने लंपास

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे १० सुपरफूड्स

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य म्हणाले, “तस्लीमा नसरीन यांना पश्चिम बंगालमध्ये आणावे, अशी मागणी मी राज्य सरकारकडे केली होती. त्यांचा आवाज दाबला जाऊ नये. त्यांनी ‘लज्जा’ या पुस्तकातून बांगलादेशातील हिंदू कुटुंबावर झालेल्या अत्याचारांचे चित्रण केले होते. मात्र, तत्कालीन डाव्या सरकारने त्यांच्या पुस्तकावर बंदी घातली. त्यांच्या कोलकाता दौऱ्याचे आम्ही स्वागत करतो.”

‘लज्जा’ या पुस्तकावर आजही बांगलादेशमध्ये बंदी आहे. या कादंबरीत बांगलादेशातील हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्याकांवरील असहिष्णुता व हिंसाचाराचे चित्रण करण्यात आले आहे. दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे आमदार अखरुझ्झमान यांनी तस्लीमा नसरीन यांनी मुस्लिम समाजाविरोधात वारंवार वक्तव्ये केल्याचा आरोप केला. “मुस्लिमांविरोधात बोलणाऱ्यांचा दुहेरी इंजिन सरकार सन्मान करते, यात आश्चर्य नाही,” असे त्यांनी म्हटले.

राज्याच्या मंत्री अग्निमित्रा पॉल यांनी मात्र तस्लीमा नसरीन यांच्या दौऱ्याचे स्वागत केले. त्या म्हणाल्या, “मागील सरकारच्या काळात त्यांना कधीही परत येण्याची संधी देण्यात आली नाही. धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी त्यांनी सत्य लिहिल्यामुळे त्यांना सुरक्षा नाकारली. आज मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली त्या १ ऑगस्टला कोलकात्यात येत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.”

इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ)चे आमदार नौशाद सिद्दीकी यांनी मात्र हा दौरा भाजपचा राजकीय डाव असल्याचा आरोप केला. “भाजपने अन्नपूर्णा योजना, स्वस्त वीज आणि महिलांच्या सुरक्षेची आश्वासने दिली होती. मात्र, त्या सर्व आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. आता जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तस्लीमा नसरीन यांना आणले जात आहे. त्या मुस्लिमांविरोधात काही वादग्रस्त वक्तव्य करतील आणि त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल,” असा दावा सिद्दीकी यांनी केला.

Exit mobile version