भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर नेणारी ‘एक्सिओम-4’ मोहिम पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. यापूर्वी १९ जून ही प्रक्षेपणाची तारीख ठरवण्यात आली होती, मात्र आता ती पुढे ढकलली गेली असून नवीन तारीख २२ जून निश्चित करण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इसरो) ने या मोहिमेच्या स्थगितीची अधिकृत माहिती दिली आहे. इसरोने सांगितले की, “इसरो, पोलंड आणि हंगेरीच्या टीम्सनी एक्सिओम स्पेससोबत मोहिमेच्या संभाव्य प्रक्षेपण वेळेबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर एक्सिओम स्पेसने नासा आणि स्पेसएक्ससोबत तयारीच्या विविध बाबींचा आढावा घेतला.
इसरोच्या म्हणण्यानुसार, स्पेसएक्सचा फाल्कन 9 रॉकेट, ड्रॅगन अंतराळयान, स्पेस स्टेशनवरील झ्वेझ्दा मॉड्यूलची दुरुस्ती, हवामानाची परिस्थिती आणि क्वारंटाइनमधील अंतराळवीरांची प्रकृती व तयारी – या सर्वांचा विचार करून, २२ जून ही पुढील संभाव्य प्रक्षेपण तारीख म्हणून निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनीही मोहिम स्थगित झाल्याची माहिती ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. त्यांनी लिहिले, “मॉड्यूल फिटनेस, क्रू हेल्थ, हवामान यासह प्रमुख निकषांनुसार एक्सिओम स्पेसने २२ जून ही एक्सिओम-4 मोहिमेसाठी संभाव्य प्रक्षेपण तारीख सुचवली आहे. ही मोहिम, इतर गोष्टींसह, भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना ISS वर घेऊन जाईल.” ते पुढे म्हणाले की, “यासंबंधी पुढील अपडेट्स वेळोवेळी शेअर केले जातील.
हेही वाचा..
हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्नच येत नाही, तर आम्ही महाराष्ट्र द्रोह समजू!
ट्रम्प अमेरिकेत असीम मुनीर यांची घेणार भेट, बंद दाराआड करणार जेवण!
पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांना सुनावलं: भारत-पाक युद्धविरामात अमेरिकेचा काहीही सहभाग नाही
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ब्रिटन दौऱ्यावर
यापूर्वीही जितेंद्र सिंह यांनी १९ जून ही प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली होती. त्यांनी म्हटले होते की, “स्पेसएक्सच्या टीमने मोहिम स्थगित करण्यास कारणीभूत असलेल्या सर्व अडचणींवर काम पूर्ण केल्याची पुष्टी दिली आहे.” मात्र, ही मोहिम आतापर्यंत तब्बल ५ वेळा स्थगित करण्यात आली आहे. भारतासाठी ‘एक्सिओम-4’ ही मोहिम अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण यामार्फत ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे ISS वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत. ते अंतराळात अन्न व पोषणावर आधारित विशेष प्रयोग करणार आहेत, जे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी तसेच अंतराळवीरांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.







