भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने माजी कर्णधार विराट कोहली यांच्या अनुपस्थितीबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सांगितले की, २० जूनपासून सुरू होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ‘जर्सी नंबर १८’ न दिसणं खूपच अजब वाटेल.
इंग्लंड क्रिकेटने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये स्टोक्स म्हणाला,
“माझ्या मते भारताला कोहलीच्या खेळातील जिद्द, स्पर्धा, आणि विजयाची तीव्र इच्छा याची नक्कीच कमतरता जाणवेल. त्याने ‘१८ नंबर’ आपल्या नावावर केला आहे. भारतीय खेळाडूच्या पाठीवर १८ नंबर न दिसणं थोडं विचित्र वाटेल, पण त्याने भारतासाठी खूप काही दिलं आहे.“
स्टोक्सने पुढे सांगितले की, कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने कोहलीला खास संदेश पाठवला होता.
“मी त्याला मेसेज केला होता की तुझ्याविरुद्ध खेळायला मिळणार नाही याचं वाईट वाटेल. कारण आम्हा दोघांना एकमेकांविरुद्ध खेळायला आवडायचं. मैदानात आम्हा दोघांची मानसिकता सारखीच असते – ही एक लढाई असते.“
विराट कोहलीची कसोटी कारकीर्द:
-
१४ वर्षांत कसोटीत ३० शतके आणि ९२३० धावा
-
सरासरी: ४६.८५
-
कसोटी कर्णधार म्हणून ४० विजय – ग्रीम स्मिथ (५३), रिकी पाँटिंग (४८), स्टीव्ह वॉ (४१) यांच्यानंतर चौथा सर्वाधिक यशस्वी कर्णधार
भारताला यंदा इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याविना खेळावे लागणार आहे. या दोघांनी इंग्लंड दौऱ्याच्या आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे आता कसोटी संघाची धुरा शुभमन गिल या युवा खेळाडूच्या हाती देण्यात आली आहे.
ही मालिका भारतासाठी केवळ एक कसोटी मालिकाच नव्हे, तर एक नवीन पर्वाची सुरुवात आहे. कारण ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ च्या नव्या चक्राचीही सुरुवात आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा कार्यक्रम:
-
पहिला कसोटी सामना: २० जून – हेडिंग्ले
-
दुसरा सामना: २ जुलै – एजबॅस्टन
-
तिसरा सामना: १० जुलै – लॉर्ड्स
-
चौथा सामना: २३ जुलै – ओल्ड ट्रॅफर्ड
-
पाचवा सामना: ३१ जुलै – केनिंग्टन ओव्हल
भारताचे ध्येय:
साल २००७ नंतर इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचे!







