‘नव्याण्णव दरवाजे बंद झाले तरी परमेश्वर आपल्यासाठी एक दरवाजा उघडा ठेवतो. त्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम, जिद्द आणि सातत्य आवश्यक आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला मारक ठरू शकतो. त्यामुळे मोबाईलचा मर्यादित वापर करून ज्ञानार्जनावर भर द्या,’ अशा शब्दांत उद्योगपती शांतिलालजी कवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई संचालित आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल, जोगेश्वरी येथे दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या व ८५ टक्के पेक्षा अधिक मार्कस मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योगपती शांतिलालजी कवाड व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा संस्थेच्या वतीने रोख बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला.
शांतिलालजी कवाड यांचे विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालावर दिमाखदार स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष मोतीराम विश्वासराव यांनी पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांचा सन्मान केला तर स्वागतगीताने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. यावेळी प्रथम दूर्वा घाडीगावकर ९५.४०% द्वितीय संस्कृती सकपाळ ९२ %, लौकिक पवार ९२ %, तृतीय खुशी चव्हाण ९१.६० % यांच्यासह ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष मोतिराम विश्वासराव यांनी विद्यार्थ्यांनी यूपीएससी, आयएएस यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे ध्येय ठेवून देशसेवेसाठी पुढे यावे, असे आवाहन केले.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये ट्रेनची कारला धडक; दोन विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू
चीनने २२ कोटी अमेरिकन मतदारांचा डेटा चोरला!
अमेरिकेत जग्गू भगवानपुरिया टोळीचा सदस्य नितीश कौशल अटकेत
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी ‘या’ ५ सवयी लावा
संस्थेचे कार्याध्यक्ष तथा शाळेचे चेअरमन सहदेव सावंत यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत सातत्याने मिळणाऱ्या शंभर टक्के निकालाबद्दल विद्यार्थी , शिक्षक, व पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थी शैक्षणिक तसेच कला व क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करीत असल्याचे सांगितले. संस्थेचे सरचिटणीस जितेंद्र पवार यांनी आई वडील व शिक्षकांनी दिलेले संस्कार हे कायम लक्षात ठेवून कोणत्याही परिस्थितीत न घाबरता आत्मविश्वासाने समोर जायला पाहिजे असं सांगितलं तर आर जे एमडीएस चे सीईओ दीपक खानविलकर यांनी महाविद्यालयात गेल्यावर मित्र निवडताना तुमचे मित्र तुमचे भविष्य घडवू शकतात पण चुकीची संगत ते भविष्य बिघडवू शकतात त्यामुळे मित्राची निवड विचारपूर्वक करा असं आवाहन केलं
यावेळी उद्योगपती शांतिलालजी कवाड यांनी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना स्वतःकडून रोख रक्कम देऊन सन्मानित केले.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अशोक परब, सरचिटणीस जितेंद्र पवार आर जे एमडीएस इंग्लिश स्कूलचे सीईओ दीपक खानविलकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका डिंपल दुसाने, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शबनम हूल्लूर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या शिक्षिका किरण मौर्या यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.
