पश्चिम रेल्वेकडून रेल्वे मार्ग, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी शनिवार, १८ जुलै आणि रविवार, १९ जुलै २०२६ च्या मध्यरात्री वसई रोड–वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गिकांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक १८ जुलै रोजी रात्री ११.५५ वाजल्यापासून १९ जुलै रोजी पहाटे ४.३० वाजेपर्यंत राहणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या ब्लॉकमुळे विरारहून पहाटे ४.३५ वाजता सुटणारी १९१०१ विरार–भरूच मेमू ही गाडी पुनर्नियोजित वेळेनुसार पहाटे ४.४५ वाजता सुटेल. याशिवाय, प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे रविवार, १९ जुलै २०२६ रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर कोणताही दिवसकालीन मेगाब्लॉक असणार नाही. त्यामुळे दिवसभर उपनगरीय लोकल सेवा नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. पश्चिम रेल्वेने प्रवाशांना विनंती केली आहे की, मध्यरात्रीच्या जम्बो ब्लॉकमुळे होणारे वेळापत्रकातील बदल लक्षात घेऊन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि प्रवासापूर्वी रेल्वेच्या अद्ययावत माहितीसह वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी.
हे ही वाचा:
बलुचिस्तानमध्ये पाक लष्करी ताफ्यावर हल्ला; ४५ हून अधिक जवान ठार?
जॉर्डनमध्ये अमेरिकन तळ लक्ष्य; विमाने, टँकर उद्ध्वस्त?
एडनच्या आखातात रासायनिक टँकरवर सशस्त्र हल्ला; जहाजावर हल्लेखोरांचा ताबा
राम मंदिरातील देणगी चोरीनंतर ‘डॅमेज कंट्रोल’
पश्चिम रेल्वेकडून रेल्वे मार्गांची सुरक्षितता, सिग्नलिंग यंत्रणेची कार्यक्षमता आणि ओव्हरहेड विद्युत उपकरणांची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी अशा प्रकारचे नियोजित देखभाल ब्लॉक नियमितपणे घेतले जातात. या कामांमुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि वेळेवर ठेवण्यास मदत होत असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
