पाकिस्तानातील अस्थिर बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा मोठा हल्ला झाला आहे. बलुच लिबरेशन आर्मी (BLA) या संघटनेने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर घात करून ४५ हून अधिक सैनिक ठार केल्याचा दावा केला आहे. हा हल्ला बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यात झाला असून, गेल्या काही आठवड्यांतील पाकिस्तानी सुरक्षा दलांवरील हा सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे. मात्र, पाकिस्तान सरकारने हल्ल्याची पुष्टी केली असली तरी मृतांचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर केलेला नाही.
वृत्तांनुसार, क्वेटा-कराची महामार्गावरील खडकुचा परिसरातून जात असलेल्या पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर BLAच्या लढवय्यांनी घात केला. या हल्ल्यात स्फोटके आणि स्वयंचलित शस्त्रांचा वापर करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. हल्ल्यानंतर काही काळ दोन्ही बाजूंमध्ये चकमकही सुरू होती.
BLAचे प्रवक्ते जियंद बलोच यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या कारवाईत ४५ हून अधिक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा आणि अनेक जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या दाव्याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. पाकिस्तान लष्कराने हल्ला झाल्याचे मान्य केले असले तरी मृत किंवा जखमी जवानांची संख्या जाहीर केलेली नाही. याचबरोबर BLAने गेल्या १५ दिवसांत बलुचिस्तानमध्ये ४८ हल्ले केल्याचाही दावा केला आहे. या हल्ल्यांमध्ये लष्करी ताफे, सुरक्षा चौक्या, पूल आणि रसद मार्गांना लक्ष्य करण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. मस्तुंग, नुश्की, केच, सुराब, खुजदार, झियारत, खरान आणि कलात या भागांमध्ये या कारवाया झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांत बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही लष्करी ताफे, पोलिस ठाणी आणि सरकारी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात पाकिस्तानने बलुचिस्तानमधील विविध हल्ल्यांत ४२ सुरक्षा कर्मचारी ठार झाल्याची माहिती दिली होती.
ही वाचा:
जॉर्डनमध्ये अमेरिकन तळ लक्ष्य; विमाने, टँकर उद्ध्वस्त?
एडनच्या आखातात रासायनिक टँकरवर सशस्त्र हल्ला; जहाजावर हल्लेखोरांचा ताबा
महेश ट्युटोरियल्सच्या ३३ शाखांना टाळे; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
मुंबई लोकलमध्ये ‘सीट वॉर’चा कळस; महिला डब्यात पेपर स्प्रे फवारला
बलुच लिबरेशन आर्मी (BLA) ही पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्याची मागणी करणारी सशस्त्र फुटीरतावादी संघटना आहे. पाकिस्तानने या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित केले असून, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देशांनीही BLAवर बंदी घातली आहे. ही संघटना पाकिस्तानच्या लष्करी तळांबरोबरच चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पांवरही सातत्याने हल्ले करत आली आहे.







