भारताविरुद्धच्या वनडे मालिकेच्या अगोदरच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. ऑलराउंडर कॅमरून ग्रीन पाठीच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी मार्नस लाबुशेनला संघात स्थान देण्यात आले आहे.
ग्रीनची दुखापत गंभीर नसली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने येणाऱ्या अॅशेस मालिकेसाठी त्याची फिटनेस जपण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ ते २५ ऑक्टोबरदरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. ग्रीन या मालिकेत खेळणार नसला तरी तो २८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या शेफिल्ड शिल्डच्या सामन्यात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,
“कॅमरून ग्रीन सध्या पुनर्वसन प्रक्रियेत आहे आणि अॅशेस मालिकेपूर्वी त्याला शेफिल्ड शिल्डच्या तिसऱ्या फेरीत खेळवले जाईल अशी शक्यता आहे.” तसेच, ग्रीनची सध्याची दुखापत गेल्या ऑक्टोबरमधील शस्त्रक्रियेच्या कारणाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रीनने नुकत्याच झालेल्या शिल्ड सामन्यात गोलंदाजीसह पुनरागमन केले होते. गेल्या वर्षी पाठीच्या शस्त्रक्रियेनंतरचा तो त्याचा पहिला सामना होता, ज्यात त्याने ४ षटकांत १ बळी घेतला.
ग्रीनच्या जागी आलेला मार्नस लाबुशेन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने क्विन्सलँडकडून खेळताना लिस्ट-ए सामन्यांत अनुक्रमे १३१ आणि १०५ धावा केल्या, तसेच फर्स्ट-क्लास सामन्यात १६० धावा ठोकल्या.
अगस्त महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत लाबुशेन अपयशी ठरला होता. त्याने फक्त १ आणि १ धावा करून निराशा केली होती, त्यामुळे त्याला निवडीपासून वगळण्यात आले होते.
हेही वाचा:
भारत-ऑस्ट्रेलियाचे पाच धुरंधर फलंदाज
भारत-ऑस्ट्रेलियाचे पाच धुरंधर फलंदाज
कॅनडामधील कपिल शर्माच्या ‘कैप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; चार महिन्यांत तिसरा हल्ला!
विश्व अन्न दिन : ८१ कोटी लोकांसाठी बघा सरकारचा निर्धार
भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा बदल आहे.
जोश फिलिपला जोश इंग्लिसच्या जागी घेतले आहे (इंग्लिस पिंडरीच्या दुखापतीमुळे बाहेर), तर मॅथ्यू कुहनेमनने अॅडम झांपाची जागा घेतली आहे (झांपा वैयक्तिक कारणांमुळे पहिला सामना खेळणार नाही). दुसऱ्या सामन्यापासून झांपा, इंग्लिस आणि अॅलेक्स केरी पुन्हा उपलब्ध राहतील.
ऑस्ट्रेलियाचा संघ:
मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, बेन ड्वार्शुइस, नाथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन, मिचेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क.
दुसऱ्या सामन्यापासून संघात सहभागी होणारे खेळाडू: अॅडम झांपा, अॅलेक्स केरी, जोश इंग्लिस.







