निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्याला हातभार लावण्याच्या उद्देशाने मराठी चित्रपटसृष्टी, नाट्यक्षेत्रातील कलाकारांनी सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीगमध्ये सहभागी होण्याचे ठरविले असून त्यातून ते समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देणार आहेत. गरजू मुलांच्या शिक्षण व संगोपनासाठी हा निधी वापरला जाणार आहे. थ्री स्टार एंटरटेनमेंट आणि राशी स्टुडिओ आयोजित आणि मॅजेस्टिक एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीगचे आयोजन केले जात आहे. १८ ऑक्टोबरला ही लीग खेळविली जाईल. ‘न्यूज डंका’ हे वेगाने वाटचाल करीत असलेले वेबपोर्टल या क्रिकेट लीगचे मीडिया पार्टनर आहे.
या सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीगमध्ये अनेक मराठी अभिनेते सहभागी होणार आहेत. एकही रुपये मानधन न घेता या कार्यक्रमातून मिळणारे पैसे मदतनिधी म्हणून बालकाश्रमांना देण्यात येणार आहे. कमलेश सावंत, विजय पाटकर, अंशुमन विचारे, अंगद म्हसकर, प्रभाकर मोरे, सुदेश म्हशीलकर, जयवंत भालेकर, अतुल आगलावे, कैलास वाघमारे, अंकुर वाढवे, प्रणव रावराणे, ओम जंगम, नयन जाधव, कांचन पगारे, संदीप जुवाटकर, महेश कोकाटे, आनंद मयेकर, जयवंत वाडकर, दिगंबर नाईक अभिजित चव्हाण, सचिन पाताडे,अनिकेत केळकर ह्यांसारखे एकाहून एक असे ९६ सरस कलाकार मंडळी या लीगमध्ये सहभागी होणार आहेत.
ज्या ज्या संस्था लहान मुलांच्या शिक्षणाची तरतूद करतात अशा लाभार्थी संस्थांना या सेलिब्रिटी क्रिकेट डोनेशन लीगचे आयोजक संचित यादव, अमर पारखे, राकेश शेळके, शीतल माने शेळके आणि मार्गदर्शक सचिन मोहिते, संदीप मोहिते,संदेश मोहिते, पूर्णिमा वाव्हळ यांच्यावतीने ही मदत दिली जाणार आहे.
गरजू लहान मुलांच्या शिक्षणाची तरतूद करणाऱ्या या संस्था आहेत, नमस्ते फाउंडेशन, फॅमिली होम, तर्पण फाउंडेशन, मंगेश भगत प्रतिष्ठान. पाच षटकांच्या या क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण युट्यूब आणि केबल चॅनल वर केले जाणार आहे. कोविडच्या नियमाचे सर्व प्रकारे पालन करून हे सामने होणार आहेत, त्यामुळे या सामन्यासाठी प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार नाही.
हे ही वाचा:
न्हावा शेवा बंदरात सापडलेले २५ किलो हेरॉइन आले अफगाणिस्तानातून
गुटखा खाण्याबद्दल दंड वसूल करणारा निघाला तोतया पालिका कर्मचारी
‘ज्या सरकारी कंपन्यांचे खासगीकरण होत आहे, त्या खासगी कंपन्याच होत्या!’
कौतुकास्पद! ई – श्रम पोर्टलवर दोन महिन्यांत ३ कोटी मजुरांची नोंदणी
विजेत्या संघास आकर्षक ट्रॉफी आणि सर्व खेळाडू आणि मान्यवरांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
हे सर्व सामने पुरंदरे मैदान, नायगाव , दादर पश्चिम येथे १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खेळवले जाणार आहेत.







