अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य बघेल यांना अटक केली आहे. छत्तीसगड दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आज (१८ जुलै) छापे टाकले. भूपेश बघेल यांच्या मुलाच्या भिलाई येथील निवासस्थानी हा छापा टाकला आणि त्यांच्यावर कारवाई केली. काही तासांच्या सखोल शोधानंतर चैतन्य बघेल यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, चैतन्य बघेल यांचा आज वाढदिवस आहे आणि आजच त्यांना अटक झाली.
चैतन्य बघेल यांच्या अटकेच्या वेळी भिलाईमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली आणि ईडीच्या गाड्या रोखण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगड विधानसभेत असताना ही अटक करण्यात आली. ईडीच्या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात घोषणाबाजी करत सरकारवर गंभीर आरोप केले.
हे ही वाचा :
संभाजी ब्रिगेड : विद्वेष, ब्राह्मणविरोध, इतिहासाच्या विकृतीकरणाचा प्रवास
भारताचा पहिला ‘अँग्लो-इंडियन वर्ल्ड कप हिरो
काँग्रेसने कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या छाप्यावरही प्रश्न उपस्थित केले. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये काँग्रेसने लिहिले आहे की, “छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या घरी ईडी पाठवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाचा वापर आपल्या पाळीव प्राण्यासारखा करत आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्या कोणत्याही विरोधी नेत्यावर छापे टाकले जातात.”
काँग्रेसने या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “ईडी पाठवण्यापूर्वी भूपेश बघेल शुक्रवारी विधानसभेत झाडे तोडण्याचा मुद्दा उपस्थित करणार होते. पण पंतप्रधान मोदींनी हे लक्षात ठेवावे की, काँग्रेस आणि त्यांचे नेते या धमक्यांना घाबरणार नाहीत. आम्ही तुमचा भ्रष्टाचार अधिक जोरदारपणे उघड करू.”







