काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत मतचोरी झाल्याचा दावा केला. भाजपशी निवडणूक आयोगाची हातमिळवणी असल्याचेही ते म्हणाले. यावर निवडणूक आयोगाने रविवारी पत्रकार परिषद घेत सविस्तव उत्तर दिले. भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) रविवारी आरोप करणाऱ्यांना सात दिवसांचा अल्टिमेटम दिला. या कालावधीत त्यांनी पुराव्यासह प्रतिज्ञापत्र सादर करावे किंवा देशाची सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा असे सर्व आरोप खोटे ठरतील, असे आयोगाने स्पष्ट केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सगळ्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. राहुल गांधी यांचे नाव न घेता आरोपांना आयोगाने उत्तर दिले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, ज्यांनी मतचोरीचे आरोप केले त्यांनी “प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल किंवा देशाची माफी मागावी लागेल. तिसरा कोणताही पर्याय नाही. जर सात दिवसांत प्रतिज्ञापत्र मिळाले नाही, तर याचा अर्थ हे आरोप निराधार आहेत.”
पत्रकार परिषदेत आयोगाने दुहेरी मतदान आणि “मत चोरी”चे आरोप फेटाळून लावले. तसेच सर्व भागधारक पारदर्शक पद्धतीने विशेष तीव्र पुनरावलोकन (SIR) यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
कुमार यांनी गांधींच्या वक्तव्याला “संविधानाचा अपमान” असे संबोधले. त्यांनी म्हटले की “मत चोरी”सारखे शब्द लोकशाही संस्थांना कमकुवत करतात. तसेच राजकीय पक्ष निवडणूक आयोगाच्या नावावर मतदारांना लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “भारताच्या मतदारांना लक्ष्य करून निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून जेव्हा राजकारण केले जाते, तेव्हा निवडणूक आयोग हे स्पष्ट करतो की तो गरीब, श्रीमंत, वृद्ध, तरुण, महिला, पुरुष, सर्व धर्मीय मतदारांसोबत खंबीरपणे उभा आहे आणि राहील.”
हे ही वाचा:
दिल्लीतील हौज काझी भागात मुलाने आईवरच केला बलात्कार
विकासकामांबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट
पाकिस्तान : पुरामुळे ३१४ मृत्यू, १५६ जखमी
गोसेवेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशची प्रगती
दुहेरी मतदानाच्या दाव्यांबाबत कुमार यांनी सांगितले की, काही मतदारांनी शंका उपस्थित केल्या असल्या तरी कोणताही ठोस पुरावा दिला गेला नाही. “ना निवडणूक आयोग, ना भारताचे मतदार अशा खोट्या आरोपांना घाबरत नाहीत,” असे ते म्हणाले.
या वक्तव्याच्या काही तास आधीच राहुल गांधींनी आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. बिहारमधील सासाराम येथे “वोटर अधिकार यात्रा” सुरू करताना त्यांनी विचारले – “मी जेव्हा मत चोरीबद्दल पत्रकार परिषद घेतली, तेव्हा निवडणूक आयोगाने मला प्रतिज्ञापत्र मागितले. पण भाजप नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र मागितले नाही. आयोग म्हणतो की ‘तुझी माहिती खरी आहे याचे प्रतिज्ञापत्र दे’. पण ही माहिती तर निवडणूक आयोगाचीच आहे. मग मला का विचारले जात आहे?”
वोटर अधिकार यात्रा ही निवडणुकांतील कथित गैरप्रकार उघड करण्यासाठी आयोजित करण्यात आली असून ती बिहारमधील २० पेक्षा जास्त जिल्ह्यांतून जाणार आहे. या उद्घाटनावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तसेच राजद नेते लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव उपस्थित होते.







