देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भगवान विष्णूच्या मूर्तीबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले होते. गुरूवारी सरन्यायाधीश गवई यांनी त्यांच्या विधानाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली. तसेच सर्व धर्मांचा आदर करतो असे ते म्हणाले.
सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी म्हटले की, “कोणीतरी मला दुसऱ्या दिवशी सांगितले की मी केलेल्या टिप्पण्या सोशल मीडियावर एका विशिष्ट पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत. पण मी सर्व धर्मांचा आदर करतो,” असे सरन्यायाधीश गवई म्हणाले.
मध्य प्रदेशातील युनेस्कोच्या जागतिक वारसा खजुराहो मंदिर संकुलाचा भाग असलेल्या जावरी मंदिरात भगवान विष्णूची सात फूट उंचीची मूर्ती पुनर्बांधणी आणि पुनर्स्थापित करण्याचे निर्देश मागणारी याचिका मंगळवारी त्यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने फेटाळून लावली. सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरन्यायाधीशांनी ही याचिका फेटाळून लावताना केलेले विधानामुळे वेगळीच चर्चा सुरू झाली. या सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीशांनी आधीच ही याचिका एक ‘प्रसिद्धी याचिका’ असल्याचे सांगितले होते.
सरन्यायाधीश म्हणाले होते की, “जर तुम्ही खरे विष्णूभक्त असाल तर प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. देवाला स्वतःलाच विचारा की काही करावे.” याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मूर्तीचे छायाचित्र दाखवत सांगितले की, मूर्तीचे शिर तुटलेले आहे आणि त्याची पुनर्निर्मिती करणे आवश्यक आहे. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारीत आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने मूर्ती बदलणे किंवा नवी बसवणे हे एएसआयच्या नियमांनुसार मान्य होईल का, हा स्वतंत्र विषय आहे, असे खंडपीठाने नमूद केले. पुढे ते म्हणाले, जर तुम्हाला शैव परंपरेविरुद्ध काही हरकत नसेल, तर तेथे भगवान शंकराचे एक विशाल शिवलिंग आहे. त्याची पूजा करा आणि शेवटी खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.
हे ही वाचा :
“राहुल गांधी भारतात नेपाळसारखी अशांतता निर्माण करू इच्छितात”
राहुल गांधींची “मतदार अधिकार यात्रा” नव्हे तर “घुसखोरांना वाचवा यात्रा”
एनडीए जितकं मजबूत तितका बिहार होणार समृद्ध
बांगलादेश निवडणूक आयोगाने शेख हसीनांचे मतदार ओळखपत्र केलं ब्लॉक!
सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला, विविध हिंदू संघटनांनी म्हटले की त्यांनी त्यांच्या श्रद्धांची थट्टा केली आहे. यानंतर गवई यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे.
