देशासह राज्यात बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. राज्यातही बांगलादेशी घुसखोरांची समस्या भेडसावत असून यावर विधानसभेतही चर्चा झाली. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारने गेल्या दोन अडीच वर्षांच्या कालावधीत बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाईची धडक मोहीम राबवल्याबद्दल सरकारचे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. तसेच याचं समस्येसंबंधी काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न हा केवळ मुंबईत नसून जालना, मालेगाव, विदर्भ, मराठवाडा, पुण्यात असा सर्वठिकाणी आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर बांगलादेशी घुसखोर येतात आणि इथे काम करण्याचा प्रयत्न करतात. शिवाय यांचा समाजविघातक गोष्टींमध्ये सहभाग असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अतुल भातखळकर यांनी प्रश्न उपस्थित केला की, तक्रार केल्यानंतर बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली जाते, पण याऐवजी या मुद्द्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बांगलादेशी घुसखोर राज्यभरात ज्या ज्या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने वास्तव्य करत आहेत अशा सर्व भागांमध्ये पोलिस कॉम्बिग ऑपरेशन येणाऱ्या काळात करणार का? कारण या बांगलादेशी घुसखोरांना स्वतः शोधून कारवाई करणे आवश्यक, असल्याचे अतुल भातखळकर म्हणाले. तसेच राज्यात काही तहसीलदारांनी बनावट जन्म मृत्यूचे दाखले देऊ केले होते त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. या एसआयटीचा अहवाल सरकारला कधी मिळेल? असा प्रश्नही आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला. तसेच नवी मुंबई येथे डिटेंशन कॅम्प उभारणीला परवानगी मिळाली आहे. तर, हा कॅम्प कधी पर्यंत उभा राहणार असा सवालही अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.
बांगलादेशींची घुसखोरी महाराष्ट्र पोखरत असताना त्यांना हुडकून काढण्यासाठी संशयास्पद वस्त्यांमध्ये कोंबिग ऑपरेशन
करता येईल का?
असा सवाल लक्षवेधीच्या माध्यमातून मी सभागृहात उपस्थित केला. मंत्री महोदयांनी त्यावर सविस्तर उत्तर दिले. pic.twitter.com/ymcBCX4jPH— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 18, 2025
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सविस्तर उत्तर देताना म्हटले की, बांगलादेशी घुसखोरांवरील कारवाया या मिळालेल्या माहितीच्या आधारे केल्या जात आहेत. केवळ तक्रारींवरून कारवाई होत नाही. पोलिसांना शंका असेल किंवा गुप्त माहिती मिळाली तर तातडीने कारवाई केली जाते आणि त्यामुळेच अलीकडे कारवाईची संख्या वाढली आहे. अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे की, काही बांगलादेशी घुसखोर हे राज्यात ३०- ३० वर्षे वास्तव्याला आहेत. त्यामुळे अशा बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी अधिक माहितीची गरज असते. यासाठी एटीएस सारख्या यंत्रणा काम करत आहेत. शिवाय, केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही वेळोवेळी संवेदनशील माहिती मिळत असते आणि त्यावरून कारवाई केली जाते.
हे ही वाचा :
“नागपुरातील हिंसाचार हा पूर्वनियोजित कट”
चेहरा झाकून हातात काठ्या, दगड घेऊन घडवली हिंसा; नागपूरमधील सीसीटीव्ही फुटेज समोर
छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह रील, दोन मुस्लीम तरुणांना अटक!
नागपूर हिंसाचार: पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवत ८० जणांना घेतलं ताब्यात
तपासासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी ही मालेगावमधील प्रकरणांसाठी नेमण्यात आली होती. त्यांच्या तपासाचा अहवाल एका महिन्यात सरकारला प्राप्त होईल आणि त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असं योगेश कदम म्हणाले. भाजपा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तक्रारी करत काही संख्याही दिली होती. दीड महिन्यांपूर्वीच्या आकडेवारीनुसार, सुमारे ३,५०० लोकांची तपासणी केली त्यात चार- पाच बांगलादेशी आढळले. याचा आणखी आढावा महिन्याभरात घेतला जाईल, असे योगेश कदम यांनी स्पष्ट केले. तसेच नवी मुंबई येथील डिटेंशन कॅम्पचे काम लवकरच सुरू होईल, असंही ते म्हणाले.







