देशातील सर्वात मोठ्या विमानकंपनी इंडिगोवर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मोठी कारवाई केली आहे आणि इंडिगोच्या सुरक्षा व ऑपरेशनल मानकांसाठी जबाबदार असलेल्या चार उड्डाण निरीक्षकांना बडतर्फ केले आहे. DGCA ने ही कारवाई या महिन्याच्या सुरुवातीला इंडिगोने हजारो उड्डाणे रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर केली आहे. याशिवाय, विमानन नियामकाने इंडिगोचे CEO पीटर अल्बर्स यांना पुन्हा समन्स पाठवले असून त्यांना शुक्रवारी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, निरीक्षण आणि देखरेकीच्या कामात हलगर्जीपणा आढळल्यामुळे DGCA ने या निरीक्षकांवर कारवाई केली आहे. नियामक संस्थेने आता इंडिगोच्या गुरुग्राम कार्यालयात दोन विशेष देखरेख पथके तैनात केली आहेत, जेणेकरून कंपनीच्या कामकाजावर कडक नजर ठेवता येईल. ही पथके दररोज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत DGCA ला अहवाल देतील. त्यापैकी एक पथक इंडिगोच्या ताफ्याची क्षमता, पायलट उपलब्धता, क्रूच्या कामाचे तास, प्रशिक्षण कार्यक्रम, ड्युटी पद्धती, अनियोजित रजा, स्टँडबाय क्रू आणि क्रू-अभावामुळे प्रभावित उड्डाणांची संख्या यावर लक्ष ठेवत आहे.
हेही वाचा..
सहा आखाती देशांनी ‘धुरंधर’वर घातली बंदी; कारण काय?
ब्रिस्टल संग्रहालयातून भारतीय कलाकृतींसह ६०० हून अधिक वस्तूंची चोरी
इंडिगोने उड्डाणे रद्द केल्याबद्दल जबाबदार असलेले चार जण निलंबित
माजी गृहमंत्री, काँग्रेस नेते शिवराज पाटील यांचे निधन
हे पथक एअरलाइनच्या सरासरी उड्डाण कालावधीची आणि नेटवर्कचीही समीक्षा करत आहे, जेणेकरून अडथळ्यांचा पूर्ण विस्तार समजता येईल. दुसरे पथक प्रवाशांवर झालेल्या परिणामांवर लक्ष केंद्रित करत आहे. यात एअरलाइन आणि ट्रॅव्हल एजंटकडून परताव्याची स्थिती, सीएआर अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईची स्थिती, वेळेवर उड्डाणे, सामान परतावा आणि एकूण रद्दीकरणाची स्थिती यांचा समावेश आहे. इंडिगोला तिच्या उड्डाण परिचालनात १० टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून वेळापत्रक स्थिर होईल आणि पुढील अडचणी टाळता येतील.
एअरलाइन साधारणतः दररोज सुमारे २,२०० उड्डाणे करते, म्हणजेच आता दररोज २०० पेक्षा जास्त उड्डाणे कमी केली जातील. नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी सांगितले की इंडिगोच्या क्रू रोस्टर, उड्डाण वेळा आणि संवादातील कुप्रशासनामुळे प्रवाशांना “गंभीर गैरसोय” झाली आहे. इंडिगोचे CEO अल्बर्स यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, एअरलाइनने भाडे मर्यादा आणि प्रभावित प्रवाशांसाठीच्या उपाययोजना यांसह मंत्रालयाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. DGCA ची चौकशी सुरू असून इंडिगोच्या CEO ला अधिक स्पष्टीकरणासाठी पुन्हा बोलावण्यात आले आहे. एअरलाइनने ३ ते ५ डिसेंबर दरम्यान गंभीर विलंबाचा सामना करणाऱ्या प्रवाशांसाठी भरपाईची घोषणा केली आहे.







