धार येथील भोजशाळा वाद प्रकरणात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने मुस्लिम पक्षाला दणका देत उच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश दिले. तसेच व्हिडिओग्राफीचे परीक्षण मध्यप्रदेश उच्च न्यायालयच करेल, असे स्पष्ट केले.
मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती कारण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) यांनी केलेल्या सर्वेक्षणाची व्हिडिओग्राफी फुटेज त्यांना मिळाली नव्हती. तसेच, एएसआयच्या अहवालावर आक्षेप नोंदवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही आणि ११ मार्च रोजी दाखल केलेल्या त्यांच्या अर्जावर १६ मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी झाली नाही, असा त्यांचा दावा होता.
मुस्लिम पक्षाच्या वतीने वकील सलमान खुर्शीद यांनी सांगितले की, भोजशाळेतील सर्वेक्षणावर आम्ही काही आक्षेप घेतले आहेत. ते व्यवस्थित मांडण्यासाठी सर्वेक्षणाची व्हिडिओग्राफी आणि रंगीत छायाचित्रे उपलब्ध करून द्यावीत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत मुस्लिम पक्षाला पुन्हा उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. कोणत्याही पक्षाला काही आक्षेप असल्यास ते थेट उच्च न्यायालयासमोर मांडावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, या वादग्रस्त स्थळाच्या व्हिडिओग्राफी संदर्भातील सर्व आक्षेपांवर अंतिम निर्णय मध्यप्रदेश उच्च न्यायालयच घेईल, असेही सांगितले.
हे ही वाचा:
सात वर्षांनंतर भारतात पोहचणार इराणी कच्चे तेल
१९८४ शीखविरोधी दंग्यांच्या पीडितांचे वकील एच. एस. फुलका भाजपमध्ये
जवानांच्या वेतन वितरणात गोंधळ, लष्करी रुग्णालयांची स्थिती चिंताजनक
सकाळी ६ वाजता नोकरी गेल्याचा मेल; ओरेकलमध्ये ३०,००० कर्मचारी कपात
मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांनुसार उच्च न्यायालय व्हिडिओग्राफीचे परीक्षण करून सर्व आक्षेपांवर निष्पक्ष निर्णय देईल, याबाबत आम्हाला शंका नाही. त्यामुळे मुस्लिम पक्षाने आपले आक्षेप थेट उच्च न्यायालयात मांडावेत आणि तेथील सुनावणीची प्रतीक्षा करावी, असा सल्ला देण्यात आला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने १६ मार्चच्या आदेशात वादग्रस्त स्थळाचे स्वतः निरीक्षण करण्यात येईल आणि त्यानंतर नियमित सुनावणी सुरू होईल, असेही नमूद केले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २ एप्रिलपासून उच्च न्यायालयात सुरू होणार आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे संरक्षित केलेले ११ व्या शतकातील स्मारक, भोजशाळा संकुल बऱ्याच काळापासून धार्मिक वादाचा विषय आहे. हिंदू ते देवी सरस्वतीला समर्पित मंदिर मानतात, तर मुस्लिम ते कमल मौला मशीद म्हणून दावा करतात.







