दिग्दर्शक आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवत असून रोज नवनवे विक्रम देखील मोडीत काढत आहे. अवघ्या २४ दिवसांत, या चित्रपटाने जागतिक स्तरावर १,०५० कोटी रुपयांचा गल्ला जमवत मोठा टप्पा ओलांडला आहे. तसेच या यशस्वी वाटचालीसोबत हा सिनेमा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी एक बनला आहे.
२८ डिसेंबर रोजी, चौथ्या रविवारी, धुरंधरने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १,०६४ कोटी रुपयांचा आकडा ओलांडला. शाहरुख खानच्या पठाण आणि प्रभासच्या कल्की २८९८ एडी या चित्रपटांच्या पूर्ण कमाईला मागे टाकले आहे. यासह, हा चित्रपट अधिकृतपणे आतापर्यंतचा सातवा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. आदित्य धर दिग्दर्शित हा चित्रपट आठवड्यामागून आठवडे सरत असताना नवनवे विक्रम रचत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर, धुरंधरने चौथ्या आठवड्यात आणखी एक अभूतपूर्व कामगिरी केली. सिनेमाने ६२ कोटी रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले.
देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर, या चित्रपटाने ६९०.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या काही दिवसांत हा हिंदी चित्रपट भारतात ७०० कोटी रुपयांचा आकडा ओलांडेल अशी अपेक्षा विश्लेषकांना आहे. परदेशात, ख्रिसमसच्या सुट्टीमुळे चित्रपटाला मोठा फायदा झाला. या चित्रपटाने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर २६ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. रविवारी, चित्रपटाने जगभरात ३० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे त्याने कल्की २८९८ एडी (१,०४२ कोटी रुपये) आणि पठाण (१,०५५ कोटी रुपये) या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांपेक्षा जास्त कमाई केली.
हे ही वाचा:
आंध्र प्रदेशात टाटा- एर्नाकुलम एक्सप्रेसचे दोन डबे आगीत जाळून खाक
परिवार एकत्र आला म्हणत अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा
भीमाशंकर ज्योतिर्लिंगसह कंगना रनौतने पूर्ण केली १२ ज्योतिर्लिंगची अद्भुत यात्रा
पाकिस्तानकडून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटात रणवीर सिंग हमजाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि आर माधवन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय ‘धुरंधर: पार्ट २’ हा चित्रपटाचा सिक्वेल तयार होत असल्याने, तो मार्च २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. तो चित्रपटही अशीच चांगली कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.







