चीनमध्ये झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीनंतर अमेरिका थोडी नरमल्यासारखी दिसते. प्रशासनातील लोक अजून चढ्या आवाजात दमबाजी करताना दिसले तरी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर मवाळ झाल्यासारखा दिसतो आहे. गेला बराच दोन्ही देशांमध्ये शाब्दीक हाणामारी सुरू आहे. ट्रम्प सुद्धा अनेकदा वाकड्यात शिरले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही थेट उत्तर दिले नाही. आज मात्र ते घडले आहे. ट्रम्प यांच्या साखरपेरणीला मोदींनी गोड उत्तर दिले आहे. अर्थात हे सगळे घडण्याची कारणे वेगळीच आहेत.
सगळ्या जगात वादळ निर्माण केल्यानंतर ट्रम्प थोडे थंड झालेले दिसतात. किमान भारताच्या बाबतीत तरी मोदी हे मित्र असल्याची, ते ग्रेट प्रायमिनिस्टर असल्याची त्यांना पुन्हा आठवण झाली आहे. अमेरिकेचे भारतासोबत विशेष संबंध आहेत, चिंता करण्याचे काहीच कारण नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली आहे. काल ट्रुथ सोशलवर त्यांनी एक पोस्ट टाकली होती. त्यात नरेंद्र मोदी, ब्लादमीर पुतीन आणि शी जिनपिंग यांचे फोटो होते. असे वाटते की आपण भारत आणि रशिया चीनच्या अंधाराजगात हरवले आहेत. त्यांना प्रदीर्घ आणि सुमृद्ध वाटचालीसाठी शुभेच्छा. अशी पोस्ट केली होती. प्रियकर गमावलेल्या प्रेयसीने उसासे टाकावेत तशी ही पोस्ट होती. याच पोस्टबाबत त्यांना एका भारतीय पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पलटी मारली. सांगितले की, भारतासोबत आमचे विशेष संबंध आहेत. मोदींबाबतही ते गोडगोड बोलले.
हेही वाचा..
लाल किल्ला परिसरात १ कोटींचा रत्नजडित कलश चोरीला!
जम्मू-काश्मीरमधील हजरतबल दर्ग्यावरील अशोक चिन्हाची तोडफोड!
जीएसटी सुधारणांमुळे एंट्री-लेव्हल कारांच्या मंदावलेल्या विक्रीला चालना
पळपुट्यांना भारतात आणण्याच्या हालचालींना गती
हे का घडतेय ते लक्षात घ्या. ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानी तोंडाळपणाची हद्द केली होती. व्हाईट हाऊसचे वाणिज्य सल्लागार पीटर नावारोव रोज भारताला धमकावत होते. रशियन तेलामुळे भारतातील ब्राह्मणांचा फायदा होतो आहे, असे अचरट विधान केले. त्यांचे वाणिज्य मंत्री हावर्ड ल्युटनीक यांनी त्यावर कडी केली. दोन महिन्यात भारत सरपटत येईल. परंतु, तेव्हा निर्णय ट्रम्प घेतील, असे विधान केले होते. खरे तर मुत्सद्द्यांची भाषा वेगळी असते. ते रोडछाप भाषा बोलत नाहीत. शब्द तोलून मापून वापरतात. महासत्तेचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुत्सद्द्यांची भाषा तर आणखी वेगळी असते. परंतु, मालकाला खूष करण्यासाठी त्याच्या सुरात सुर मिसळण्याचा व्हायरस सगळ्या जगात पसरलेला दिसतो. अमेरिका त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.
मोदी माझे मित्र आहेत, हे ट्रम्प यापूर्वीही बोलले होते. परंतु त्यासोबत ते एक नवी धमकी द्यायचे. यावेळी तसे झालेले नाही. मोदींची प्रशंसा करताना त्यांनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांचेही कौतुक केले. या संबंधांबाबत चिंता नको असे सांगितले. ही चिंता कोणाला होती, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला असण्याचे काहीच कारण नाही. ती होती अमेरिकेतील मुत्सद्द्यांना. ते सतत सांगत होते, भारतासोबत संबंध बिघडवू नका. भारत हा आपला शत्रू नाही. भारताशी सबंध सुधारण्यासाठी गेली दोन अडीच वर्षे आपण सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. हे निक्की हेही यांनी सांगितले, डेमोक्रॅट्स पक्षाच्या नेत्या कमला हॅरीस यांनीही हेच सांगितले. हे कालपरवा अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनीही सांगितले. हेच अर्थतज्ज्ञ जेफ्री सॅक्स सांगत होते. ज्यांनी ट्रम्प यांना हे सल्ले दिले त्यांचा आकडा खूप मोठा होता. परंतु, ट्रम्प मनावर घेत नव्हते. आजही त्यांनी ते मनावर घेतले आहे, असे मानायचे कारण नाही. ते उद्या काही वेगळेच बोलू शकतील. परंतु या क्षणी ते जे काही बोलले आहेत, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला जो काही प्रतिसाद दिला आहे, तो महत्वाचा आहे. काही तरी वेगळे आणि चांगले घडणार आहे, हे संकेत देणारा आहे.
ट्रम्प जे काही म्हणाले त्याबद्दल धन्यवाद देतो आणि त्याचे समर्थनही करतो. भारत आणि अमेरिकेत जागतिकस्तरावर व्यापक आणि धोरणात्मक अशी भविष्याभिमुख भागीदारी आहे, असे म्हटले आहे. ट्रम्प अचानक का नरमले? कुरुक्षेत्रात युद्धासाठी सज्ज असलेल्या दोन्ही सैन्यदलांना ताटकळत ठेवून भगवान कृष्ण अर्जुननाला गीता सांगत बसले. सगळी गीता सांगून झाली. अर्जुनाला भगवंतांचे म्हणणे पटले, परंतु तरीही तो काही गांडीव हाती धरायला तयार नव्हता. अखेरचा उपाय म्हणून भगवंतांनी त्याला विश्वरुप दर्शन दिले. त्यानंतर अर्जुन लढायला सज्ज झाला.
यातला फक्त विश्वरुपाचा म्हणजे शक्ति प्रदर्शनाचा संदर्भ लक्षात घ्या, बाकीचे संदर्भ बाजूला ठेवा. शक्ति प्रदर्शनामुळे अनेकदा अनेकांचे डोळे खाडकन उघडतात. अमेरिकेतील तमाम शहाण्यांनी सांगूनही ट्रम्प यांची गाडी रुळावर यायला तयार नव्हती. परंतु, व्हीक्ट्री डे परेडमध्ये चीनने जे शक्तिप्रदर्शन केले त्यानंतर ट्रम्प यांचे डोळे उघडले अस मानायला वाव आहे. या शक्ती प्रदर्शनाची दखल सगळ्या जगाने घेतली. किंबहुना सगळ्या जगाने दखल घ्यावी म्हणून चीनने सुमारे ५ अब्ज डॉलर्स खर्चून या चमकदार सोहळ्याच आयोजन केले होते. या परेडनंतर अमेरिकेत अनेकांनी चिंता व्यक्त केलेली आहे. सेंटर ऑन मिलिटरी एण्ड पोलिटीकल पॉवर एट द फाऊंडेशन फॉर डीफेन्स ऑफ डेमॉक्रॅसीज या संस्थेतील वरिष्ठ संचालक ब्रॅडली बॉमन म्हणालेत की, चीनचे सैन्य प्रदर्शन हा अतिशय गंभीर मामला आहे, ही शक्ती म्हणजे अमेरिकेला असलेला धोका आहे. चीनने प्रगत हायपरसोनिक मिसाइल्स आणि इंटरकांटिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स (उदा. DF-61) आधी घातक शस्त्रांचे प्रदर्शन केले आहे. या डीएफ-६१ डीएफ-५सी या क्षेपणास्त्रांचा पल्ला १२५०० किमी ते २०००० किमी इतका आहे. ज्याचा धोका थेट अमेरिकेला आहे.
गेल्या काही काळात अमेरिकेने संरक्षण संशोधनात खर्च कमी केला आहे, तो वाढवण्याची गरज आहे. उत्तम संरक्षण साधने विकसित केली पाहिजेत. संरक्षण क्षमतेचा विस्तार केला पाहिजे. त्याच बरोबर त्यांनी अमेरिकेच्या सामरीक भागीदारांची आठवणही करून दिली, ज्यात क्वाड अर्थात भारताचा समावेश आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये हा लेख प्रसिध्द झाला आहे.
असेच लेख रॉयटर, द गार्डीयन, वॉशिंग्टन पोस्ट आदी दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. अमेरिका सुद्धा आपल्या टप्प्यात आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न या परेडच्या माध्यमातून चीनने केलेला आहे. इंडो पॅसिफीकमध्ये कमांडर असलेले हवाई दलाचे जनरल केविन श्रायडर म्हणालेत ही चीनने लष्करी परेडमध्ये दाखवलेली तंत्रज्ञान आणि शक्ती प्रदर्शनामुळे अमेरिका खचलेली नाही. परंतु, याबाबत जगाच्या एक पाऊल पुढे राहण्याचा आमचा प्रय़त्न असेल. चीनच्या परेडचा अमेरिकेवर झालेला परीणाम खोलवर दिसून येतो आहे. जमीन, आकाश आणि पाण्यातून क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता चीनने दाखवली. अंतराळातील उपग्रहांचा निकाल लावण्याचे सामर्थ्य दाखवले. अमेरिकी विश्लेषक चिंतेत अशासाठी आहेत कारण चीनच्या या शक्तीचा थेट धोका अमेरिकेला आहे.
ट्रम्प यांच्या बदलेल्या सुराचे मूळ यातच आहे. चीनने व्हीक्ट्री डे परेडच्या निमित्ताने जे जगाला दाखवले, त्याचा अर्थ एवढाच आहे की उद्या आम्ही तैवानचा घास घेतला तर आमच्या वाटेला जाण्याचा विचार करू नका. तैवान सुद्धा हादरलेला आहे. जगाच्या राजकारणात अमेरिका इतका एकाकी कधीही पडलेला नव्हता. सध्याच्या परीस्थितीचा फायदा घेत चीनने काही दु:साहस करण्याचा प्रय़त्न केला तर त्याचा सगळ्या मोठा झटका ट्रम्प यांना बसणार आहे. आपणच माईक टायसन, आपणच रॅम्बो असे दाखवण्याचा जो काही प्रय़त्न ट्रम्प गेल्या काही काळात करतायत, त्याची हवा चीन कोणत्याही क्षणी काढू शकतो याची जाणीव त्यांना झालेली आहे. मौनाचीही भाषा असते. राजकारणात याचा वापर किती प्रभावीपणे होऊ शकतो याची झलक भारताने जगाला दाखवलेली आहे. अमेरिकी प्रशासनातील नेते, अधिकारी जेव्हा अकलेचे तारे तोडत होते, तेव्हा भारताचे परराष्ट्र मंत्रालय शांत होते. आपण भारत आणि रशिया गमावला आहे, अशी पोस्ट काल ट्रम्प यांनी टाकली. त्यावरही आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने नो कॉमेंट्स अशी प्रतिक्रीया दिली. धमक्यांनंतर भारत दबत नाही, बिथरत नाही, इतकंच काय आपल्याकडे दुर्लक्ष करतो आहे, असे चित्र गेल्या काही काळात निर्माण होत होते. ट्रम्प यांची चीथू चीथू होत होती. ते ट्रम्प यांच्या लक्षात येऊ लागले आहे. एवढाच त्यांच्या ताज्या विधानांचा अर्थ. मोदींनी त्याला जो प्रतिसाद दिला आहे, त्याचा अर्थही केवळ एवढाच आहे, की अजून वेळ गेलेली नाही.







