पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या नवव्या आवृत्तीतील दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाचे गुलाम न बनता स्वतःचा विकास आणि विस्तार करा, असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कोयंबटूर येथील विद्यार्थी आदी विक्रम यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारला की, आपल्याला एआयची भीती वाटली पाहिजे का? ते म्हणाले, आजच्या काळात एआयचा प्रभाव वाढत चालला आहे. अनेक कंपन्यांमध्ये आता माणसांऐवजी एआय कर्मचारी काम करताना दिसतात. अशा परिस्थितीत एआयची भीती वाटली पाहिजे का आणि करिअर निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात?
या प्रश्नाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, प्रत्येक युगात नव्या तंत्रज्ञानाबाबत चर्चा होत असते. पूर्वी संगणकामुळे काय बदल होणार यावर चर्चा होत होती. अशी चर्चा प्रत्येक काळात होत राहते. मात्र कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. आपण त्याचे गुलाम होऊ नये, हीच खरी गरज आहे. निर्णय घेणारे आपण असले पाहिजे, तंत्रज्ञान माझा मालक होऊ शकत नाही, हे ठरवले पाहिजे.
हे ही वाचा:
“गोगोई यांनी पाकिस्तान गृहमंत्रालयाने दिलेले पत्र सार्वजनिक करावे”
डॉलर कमजोर; भू-राजकीय तणावामुळे सोने-चांदी झळाळले!
मुंबई किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात मोठी कारवाई
दुचाकीच्या मोहापायी अनाथ तरुण बनला चोर
मोबाईलच अनेकांचा मालक
चिंता व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज अनेक मुलांसाठी मोबाइलच त्यांचा मालक बनला आहे. मोबाइल नसला तर त्यांना जेवणही करता येत नाही आणि टीव्ही नसेल तर ते राहू शकत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण त्या गोष्टींचे गुलाम झालो आहोत. विद्यार्थ्यांना सल्ला देताना त्यांनी सांगितले की, मनात एकदा ठाम ठरवा की आपण गुलाम नाही. प्रत्येक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करता येतो, पण त्यावर अवलंबून राहू नये.
उदाहरण देत पंतप्रधान म्हणाले की, एआयला जर तुम्ही विचारले की एखादे पुस्तक कुठे मिळेल किंवा एखाद्या विषयावर कोणते पुस्तक चांगले आहे, तर एआय तुम्हाला मार्गदर्शन करू शकते आणि ते उपयुक्त ठरते. मात्र जर तुम्ही एआयला सांगितले की मी अभ्यास करणार नाही, तूच मला पुस्तकातील सगळं सांग, तर काहीतरी घोळ आहे.
ते पुढे म्हणाले की, कामाची प्रकृती सतत बदलत राहते. आपल्याला तंत्रज्ञान समजून घेऊन स्वतःचा विस्तार करावा लागेल. तंत्रज्ञानाची ताकद आपल्या कौशल्यांशी जोडावी लागेल. आपल्या कामामध्ये मूल्यवर्धन केले पाहिजे. असे केल्यास कितीही प्रगत तंत्रज्ञान आले तरी त्याचा आपल्याला फायदा होईल आणि त्याची भीती वाटणार नाही.







