जर तुम्हाला बटाटे खाणं आवडत असेल, तर ते फ्रेंच फ्राइजच्या रूपात न खाता उकडून किंवा भाजून खाणं अधिक फायदेशीर ठरेल.
ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (BMJ) प्रकाशित झालेल्या एका नव्या संशोधनानुसार, आठवड्यात ३ वेळा फ्रेंच फ्राइज खाल्ल्यास टाइप-२ डायबिटीजचा धोका तब्बल २० टक्क्यांनी वाढतो.
या अभ्यासात २ लाखांहून अधिक प्रौढांच्या आहाराच्या सवयी ३० वर्षांपर्यंत ट्रॅक करण्यात आल्या. त्यानुसार, उकडलेले, भाजलेले किंवा मॅश केलेले बटाटे डायबिटीजच्या धोक्याशी संबंधित नाहीत.
संशोधकांनी असंही सांगितलं की, जर बटाट्याच्या ऐवजी साबुत धान्य खाल्लं गेलं, तर डायबिटीजचा धोका आणखी कमी होऊ शकतो.
हार्वर्ड टी.एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्रमुख संशोधक प्रो. वॉल्टर विलेट म्हणाले, “सार्वजनिक आरोग्यासाठी हा संदेश साधा आणि परिणामकारक आहे. रोजच्या खाण्यापिण्यात छोटे बदल सुद्धा टाइप-२ डायबिटीजवर मोठा परिणाम करू शकतात.”
त्यांनी पुढे सांगितले, “फ्रेंच फ्राइज कमी करून साबुत धान्य खाल्ल्यास ही गंभीर व्याधी टाळता येऊ शकते.”
या संशोधनात सहभागी असलेल्या २,२२,९९९ व्यक्तींमध्ये अभ्यासाच्या कालावधीत २२,२९९ लोकांना डायबिटीज झाला.
संशोधनात असं दिसून आलं की, जर भाजीव बटाट्याच्या ऐवजी साबुत धान्य खाल्लं गेलं, तर ४ टक्क्यांनी, आणि फ्रेंच फ्राइजऐवजी साबुत धान्य खाल्ल्यास हा धोका १९ टक्क्यांनी घटतो. इतकंच नव्हे तर, फ्रेंच फ्राइजऐवजी रिफाइंड ग्रेन्स खाल्लं गेलं तरीही धोका कमी होतो.







