शनिवारी पहाटे आसामच्या होजई जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात झाला. सैरंग- नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ट्रेन हत्तींच्या कळपाला धडकून झालेल्या अपघातात आठ जंगली हत्तींचा मृत्यू झाला आणि एक हत्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, अनेक रेल्वे डबे रुळावरून घसरले.
ईशान्य सीमा रेल्वे (एनएफआर) च्या प्रवक्त्याने सांगितले की, या धडकेमुळे ट्रेनचे इंजिन आणि पाच डबे रुळावरून घसरले. जमुनामुख- कामपूर विभागातील चांगजुराई परिसरात पहाटे २:१७ वाजता हा अपघात झाला. गाडीतील कोणत्याही प्रवाशांना दुखापत झाली नाही. नागाव विभागीय वन अधिकारी सुहास कदम यांनी सांगितले की, वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. स्थानिक रहिवाशांच्या मते, कळपात सुमारे आठ हत्ती होते, त्यापैकी बहुतेकांचा जागीच मृत्यू झाला.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रेल्वे लोको पायलटने रुळांवर हत्तींना पाहिल्यानंतर आपत्कालीन ब्रेक लावले, परंतु तेवढा वेळ न मिळाल्याने हत्ती आणि ट्रेनची धडक झाली आणि ही दुर्घटना घडली. शिवाय हे ठिकाण हत्तींसाठी नियुक्त केलेले कॉरिडॉर मानले जात नाही.
हे ही वाचा..
सीरियामध्ये ISIS विरुद्ध अमेरिकेचे ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’!
जम्मू- काश्मीर: किश्तवाड जिल्ह्यामधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्याशी संबंध
भारतातील सर्वाधिक पसंती मिळालेल्या १० ट्विटपैकी आठ ट्विट पंतप्रधान मोदींचे
बांगलादेशात टागोरांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्थापन झालेले ‘छायानौत’ भस्मसात
अपघातानंतर, या भागातून जाणाऱ्या गाड्या अप लाईनवर वळवण्यात आल्या. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून मदत पथके घटनास्थळी पोहचली आहेत. रुळांवर हत्तीचे अवशेष विखुरल्यामुळे अप्पर आसाम आणि ईशान्येकडील इतर भागात रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. सैरंग- नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस ही मिझोरममधील सैरंग (ऐझॉलजवळ) ते दिल्लीतील आनंद विहार टर्मिनलला जोडणारी एक प्रमुख ट्रेन आहे.







