राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार २०२५ तसेच ऊर्जा संरक्षणावरील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे पुरस्कार प्रदान केले. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ऊर्जा संरक्षण हे सर्वाधिक पर्यावरणस्नेही असून ऊर्जेचा सर्वात विश्वासार्ह स्रोत आहे. ऊर्जा संरक्षण हा केवळ पर्याय नसून आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. ऊर्जा वाचवणे म्हणजे फक्त वापर कमी करणे नव्हे, तर ऊर्जेचा सुज्ञ, जबाबदार आणि कार्यक्षम वापर करणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले.
अनावश्यकपणे विद्युत उपकरणांचा वापर टाळणे, ऊर्जा-कार्यक्षम उपकरणांचा अवलंब करणे, घर व कार्यालयांमध्ये नैसर्गिक प्रकाश आणि वायुवीजनाचा वापर करणे तसेच सौर व इतर नवीकरणीय ऊर्जा पर्याय स्वीकारणे – या सर्व गोष्टींमुळे केवळ ऊर्जा बचत होत नाही तर कार्बन उत्सर्जनही कमी होते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. स्वच्छ हवा, सुरक्षित जलस्रोत आणि संतुलित पर्यावरणीय व्यवस्थेसाठी ऊर्जा संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण वाचवलेली ऊर्जेची प्रत्येक युनिट ही निसर्गाप्रती आणि येणाऱ्या पिढ्यांप्रती आपली जबाबदारी दर्शवते.
हेही वाचा..
महाज्योतीमार्फत ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन -ऑफलाईन प्रशिक्षण
कौशल्य विकास, प्रशिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी
सर्व शासकीय विभागांमध्ये गुणवत्ता नियंत्रणाची प्रभावी यंत्रणा कार्यरत
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक
तरुण आणि बालकांनी ऊर्जा संरक्षणाबाबत जागरूकता दाखवली, तर या क्षेत्रातील उद्दिष्टे साध्य होऊ शकतात आणि देशाचा शाश्वत विकास सुनिश्चित होऊ शकतो, असे राष्ट्रपतींनी सांगितले. स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जेपर्यंत पोहोच मिळाल्याने समुदाय सक्षम होतात, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होतात. त्यामुळे हरित ऊर्जा ही केवळ वीज निर्मितीपुरती मर्यादित नसून सक्षमीकरण आणि समावेशक विकासाचे प्रभावी साधन आहे. पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन यांसारख्या उपक्रमांमुळे जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी होत असल्याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. नवीकरणीय ऊर्जा वापर दायित्व आणि उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजनांच्या माध्यमातून सरकार नवीकरणीय ऊर्जा स्वीकारण्यास आणि ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देत आहे.
राष्ट्रपतींनी सांगितले की, २०२३–२४ मध्ये भारताच्या ऊर्जा कार्यक्षमतेसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे ५३.६० दशलक्ष टन तेल समतुल्य ऊर्जा वाचवण्यात यश आले आहे. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होत असून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनातही लक्षणीय घट झाली आहे. भारताच्या ऊर्जा संक्रमणाच्या यशासाठी प्रत्येक क्षेत्रातील आणि प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व क्षेत्रांत ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी वर्तनात बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. ऊर्जा संरक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्व घटकांचे राष्ट्रपतींनी कौतुक केले आणि त्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांसाठी निरोगी आणि उज्ज्वल भवितव्य घडवेल, असा विश्वास व्यक्त केला.







