दक्षिण आफ्रिका टी२० लीगच्या २०२५-२६ हंगामाला २६ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या लीगचा हा चौथा हंगाम असून, यंदाच्या लिलावानंतर अनेक संघ नव्या रूपात दिसणार आहेत. प्रिटोरिया कॅपिटल्सने दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज याची या हंगामासाठी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, संघाचे मुख्य प्रशिक्षक भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली असून, त्यांच्या सोबत काम करण्याबाबत महाराज प्रचंड उत्सुक आहेत.
जिओस्टार प्रेस रूममध्ये बोलताना महाराज म्हणाले, “प्रिटोरिया कॅपिटल्ससोबतचा हा माझा पहिलाच हंगाम आहे. प्रशिक्षक मंडळात सौरव गांगुली आणि शॉन पोलॉक यांसारखे दिग्गज आहेत. सौरव सरांशी काही संवाद झाला असून, त्यांच्या सोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. स्पर्धेदरम्यान त्यांचा अनुभव संघासाठी निश्चितच उपयोगी ठरेल.”
ते पुढे म्हणाले, “प्रिटोरियामध्ये धावा मोठ्या प्रमाणावर होतात. त्यामुळे फलंदाजांना त्यांचा नैसर्गिक खेळ करू द्यावा लागेल. गोलंदाज म्हणून आम्हाला विकेट मिळवण्याचे मार्ग शोधावे लागतील. स्पर्धेला सुरुवात होण्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.”
महाराज हे लीगच्या पहिल्या हंगामापासून डरबन सुपर जायंट्सकडून खेळत होते. मात्र यंदाच्या लिलावात ते प्रिटोरिया कॅपिटल्समध्ये दाखल झाले असून, थेट कर्णधारपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रिटोरिया कॅपिटल्सने पहिल्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती; मात्र सनरायझर्स इस्टर्न केपकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर संघाला अंतिम फेरी गाठता आलेली नाही. केशव महाराजांच्या नेतृत्वाखाली यंदा अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचे लक्ष्य संघाने ठेवले आहे.
महाराज यांनी आतापर्यंत लीगच्या तीन हंगामांत ३३ सामन्यांत २७ बळी घेतले आहेत. प्रिटोरिया कॅपिटल्सचा पहिला सामना २७ डिसेंबर रोजी जोबर्ग सुपरकिंग्सविरुद्ध होणार आहे.







