काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘वोटर अधिकार यात्रा’दरम्यान चोरीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बिहारच्या दरभंगा येथे आयोजित यात्रेदरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे पर्स, मोबाईल चोरी केले आहेत.
या घटनांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अली असरफ फातमी यांचे पाकीट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याशिवाय आरजेडी नेते भोला सहनी यांचा मोबाईल व पाकीट देखील चोरीस गेला. मात्र, एक चोरटा चोरी करताना रंगेहाथ पकडला गेला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
फातमी यांनी घटनेची पुष्टी करत सांगितले, “फक्त माझाच नव्हे, तर अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांचे सामान चोरीला गेले आहे.” भोला सहनी यांनीही आपले मोबाईल आणि पाकीट चोरी झाल्याचे मान्य केले आहे.
दरभंगामधील या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पोलिसांच्या सुरक्षेवर आणि तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. यात्रेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती आणि त्याचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांची आर्थिक हानी केली.
हे ही वाचा :
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी उधळली; दोन दहशतवादी ठार!
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन
कोणीतरी तुमच्यावर खूश नाही! कोण म्हणाले मोदींना!
जम्मू-काश्मीर : वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलनात ३३ जणांचा मृत्यू!
दरम्यान, राहुल गांधी यांची ‘वोटर अधिकार यात्रा’ आज मोतिहारीत पोहोचली. ११व्या दिवशी ही यात्रा दरभंगाहून सुरू होऊन मुजफ्फरपूरमार्गे संध्याकाळी सीतामढीला दाखल झाली. या दरम्यान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका केली. त्यांनी भाजपच्या ‘गुजरात मॉडेल’ला “वोट चोरीचे मॉडेल” ठरवत, २०१४ मध्ये देशपातळीवर आणल्याचा आरोप केला.







