या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सोने दर २,६८९ रुपये वाढून २४ कॅरेटच्या १० ग्रॅमची किंमत १,००,९४२ रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी हाच दर ९८,२५३ रुपये होता.
२२ कॅरेट सोने देखील ९०,००० रुपयांवरून वाढून ९२,४६३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. १८ कॅरेट सोने ७३,६९० रुपयांवरून ७५,७०७ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.
चांदीच्या किमतीतही मोठी वाढ झाली असून, चांदीचा दर ५,०८६ रुपये वाढून १,१४,७३२ रुपये प्रति किलो झाला आहे. ही किंमत ७ ऑगस्टला नोंदवलेल्या सर्वकालीन उच्चांकाच्या अगदी जवळपास आहे, जेव्हा चांदीचा भाव १,१५,२५० रुपये प्रति किलो होता.
या वाढीमागे जागतिक बाजारातील अस्थिरता कारणीभूत आहे. विशेषतः अमेरिकेने विविध देशांवर टॅरिफ लावल्याने जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढली आहे. अशा परिस्थितीत, सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीची मागणी वाढते आणि त्याचा परिणाम किमतींवर होतो.
यावर्षी १ जानेवारीपासून आतापर्यंत २४ कॅरेट सोने ७६,१६२ रुपयांवरून २४,७८० रुपयांनी किंवा सुमारे ३२.५३ टक्क्यांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे, चांदीचा दर ८६,०१७ रुपयांवरून २८,७१५ रुपयांनी किंवा ३३.३८ टक्क्यांनी वाढून १,१४,७३२ रुपये प्रति किलो झाला आहे.
सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ सुरू राहण्याची शक्यता आहे, अशी अंदाजे बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.







