मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातील लहर येथे २ फेब्रुवारी १९७० रोजी जन्मलेल्या प्रज्ञा सिंह यांना लहानपणापासून धार्मिक विचारांचे आणि हिंदू संस्कारांचे बाळकडू मिळाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडल्या गेलेल्या कुटुंबातील प्रज्ञा सिंह यांनी लहान वयातच हिंदू संघटन करण्याचे काम सुरु केले. एवढेच नाही, हिंदू समाज आणि राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याच्या हेतूने विधिवत संन्यास घेऊन स्वतःचे संपूर्ण जीवन देश, देव आणि धर्माला वाहण्याचा निर्धार केला.
प्रज्ञा सिंह यांचे वडील डॉ. सी. पी. सिंग हे आयुर्वेदिक चिकित्सक होते. हिंदुत्ववादी विचारांचे असल्याने त्यांचे हिंदू संघटनाचे कार्य सातत्याने चाले. प्रज्ञा यांनी देखील आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला.
प्रज्ञा सिंह यांची विद्यार्थीदशा अभ्यासू वृत्ती, आरोग्यपूर्ण जीवनपद्धती आणि सामाजिक जाणीव यांचे उत्कृष्ठ समायोजन दर्शवते. त्यांनी लहर कॉलेज (भिंड) येथे शिक्षण घेत इतिहास विषयात पदवी मिळवली. त्यानंतर भिंड येथील एम.जी.एस. कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेवढ्यावर न थांबता त्यांनी बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन (B PEd) पदवी देखील मिळवली. त्या एम.जी.एस. कॉलेजच्या महिला कबड्डी संघाच्या कर्णधार होत्या.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्या विद्यार्थी संघटनेतही सक्रिय होत्या. त्यांनी साधारणपणे १९९३ ते १९९७ या काळात त्यांनी विद्यार्थी संघटनेचे कार्य केले. मुळातच हिंदुत्ववादी विचारांच्या प्रज्ञा सिंह त्यांचे शिक्षण संपताच वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी हिंदू समाजाच्या हितासाठी, विशेषतः हिंदू महिला-मुलींचे सबलीकरण करण्याचे कार्य जोमाने सुरु केले.
हे ही वाचा:
‘बनावट’ पोलिसांनी घरात घुसून ट्रान्सफर करून घेतले ९० हजार
दुर्धर आजाराने त्रस्त आईने घेतला पोटच्या बाळाचा जीव
शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी – गावस्कर आणि सोबर्सच्या विक्रमांवर मोहर!
रुग्णालयात उंदराने रुग्णाला कुरतडलं
२००२-२००३ च्या सुमारास, त्यांचे कुटुंब गुजरातमधील सुरत येथे स्थलांतरित झाले. त्यानंतर २००६ च्या सुमारास त्यांनी स्वामी अवधेशानंद गिरी यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी संन्यास घेऊन ‘साध्वी’ म्हणून आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी एका बाजूला लोकांची धर्मभावना जागी करणे आणि दुसऱ्या बाजूला त्यांना राष्ट्रसेवेकडे वळवणे असे दुहेरी कार्य सुरु ठेवले. हिंदू संघटनेच्या माध्यमातून कार्य करत हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्य केले. आजही त्यांच्या गोशाळा आहेत.
मालेगाव बॉम्बस्फोट २००८ चे किटाळ
२९ सप्टेंबर २००८ रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे एका मशिदीजवळ मोटरसायकल मध्ये बॉम्ब ठेवण्यात आला व त्याचा स्फोट झाला. यात सहा जण ठार झाले आणि १०० हून अधिक लोक जखमी झाले. ही घटना रमजानच्या महिन्यात, नवरात्री उत्सवाच्या पूर्वसंध्येला घडली. या प्रकरणात प्रज्ञा सिंह यांना २३ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर क्रूरकर्मा औरंगजेबालाही लाजवेल असे त्यांचे छळसत्र सुरु झाले. केवळ तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतानाच नाही, तर कारागृहात असतानाही त्यांचा छळ अव्याहत सुरु राहिला. परिणामी त्यांची तब्येत बिघडली आणि त्या अत्यवस्थ झाल्या. कर्करोगाशी झुंजताना खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात चालत जाण्याएवढेही त्राण त्यांच्यात राहिले नाही तेव्हा त्यांनी उपचारांसाठी जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. सरकारने त्या परिस्थितीत देखील जामिनाला विरोध केला. शेवटी बॉम्बे हायकोर्टाने २५ एप्रिल २०१७ रोजी त्यांना जामीन मंजूर केला.
२०१९ लोकसभा निवडणूक भोपाळ मतदारसंघ विजय
कारागृहातून बाहेर आल्यावर प्रज्ञा सिंह यांनी पुन्हा हिंदुत्वाचा प्रसार आणि समाजकार्य सुरु केले. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरुद्ध भोपाळ येथून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. दिग्विजय सिंह यांनी सातत्याने हिंदू दहशतवादाच्या कपोलकल्पित थियरीचा पुरस्कार केलेला असल्याने संपूर्ण निवडणुकीत हाच मुद्दा महत्वाचा ठरला. जनतेने यावेळी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यामागे एकजुटीने उभे राहण्याचा निर्धार केला होता. परिणामी, ३.६ लाख मतांच्या फरकाने त्यांनी विजय मिळवला. दिग्विजय सिंह आणि काँग्रेसचा दंभ गळावा असाच हा निकाल होता. तथापि, प्रज्ञा सिंह यांना काँग्रेस-डाव्या परिसंस्थेने लक्ष करणे सुरूच ठेवले. आज न्यायालयाच्या निकालामुळे मात्र त्यांच्या चरित्राला नव्याने झळाळी मिळाली आणि कोणताही हिंदू दहशतवादी असूच शकत नाही हे सिद्ध झाले.







