आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शाह यांना भारतातील महिला क्रिकेटच्या विकासासाठी ‘ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर याबाबत माहिती देत जय शाह यांच्या सन्मानाचा फोटो शेअर केला. बीसीसीआयने लिहिले, “भारतीय क्रिकेटसाठी ही एक अविस्मरणीय संध्याकाळ आहे. जय शाह यांना ‘ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. समान वेतन धोरण आणि महिला प्रीमियर लीगच्या विकासासाठी आपली दूरदृष्टी जागतिक क्रिकेटला नवी दिशा देत आहे.”
एनडीटीव्हीच्या वतीने आयोजित ‘इंडियन ऑफ द इयर २०२५’ या कार्यक्रमात जय शाह यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या हस्ते जय शाह यांना सन्मानित करण्यात आले.
जय शाह हे ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव होते. त्यांच्या कार्यकाळात भारतीय महिला क्रिकेटच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महिला क्रिकेटपटूंना प्रति सामना मानधन पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणेच देण्याचा ऐतिहासिक निर्णय याच काळात लागू करण्यात आला.
तसेच, पुरुष आयपीएलच्या धर्तीवर २०२३ मध्ये महिला प्रीमियर लीगची सुरुवात करण्यात आली. या दोन क्रांतिकारी निर्णयांमुळे भारतीय महिला क्रिकेटपटू आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून, क्रिकेटच्या दर्जातही लक्षणीय वाढ झाली आहे. या बदलांमध्ये जय शाह यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
समान वेतन धोरण आणि महिला प्रीमियर लीगव्यतिरिक्त, देशांतर्गत महिला क्रिकेट मजबूत करणे तसेच महिला क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यातही जय शाह यांचे मोठे योगदान राहिले आहे.
जय शाह यांनी १ डिसेंबर २०२४ रोजी अधिकृतपणे आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांची ऑगस्ट महिन्यात बिनविरोध निवड करण्यात आली होती.







