सिया दोषी असेल तर मृत्युदंडाची शिक्षा द्या!

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या वडिलांची प्रतिक्रिया

सिया दोषी असेल तर मृत्युदंडाची शिक्षा द्या!

लोहगड किल्ल्याजवळ केतन अग्रवाल याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयलबाबत तिचे वडील प्रवीण गोयल यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जर न्यायालयात मुलगी दोषी सिद्ध झाली, तर तिला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा, अगदी मृत्युदंडही व्हावा, असे त्यांनी म्हटले आहे. मुलीवर झालेल्या आरोपांचा धक्का अजूनही पचवता आलेला नसल्याचे सांगतानाच, न्यायाच्या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ नये, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

प्रवीण गोयल म्हणाले की, सिया अशी कृती करू शकते, यावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नाही. “तिने आयुष्यात कधी माझ्याशी खोटे बोलले नाही. ती नेहमी योग्य मार्गावर चालणारी मुलगी होती. त्यामुळे तिच्यावर असे गंभीर आरोप झाल्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे,” असे त्यांनी सांगितले. या धक्क्यामुळे स्वतःची प्रकृतीही बिघडल्याचे त्यांनी सांगितले. मुलीच्या अटकेनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून सध्या पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब मानसिक धक्क्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

एकीकडे मुलीवरील आरोपांवर विश्वास ठेवणे कठीण जात असल्याचे सांगतानाच, प्रवीण गोयल यांनी न्यायप्रक्रियेबाबत ठाम भूमिका घेतली. “जर माझी मुलगी दोषी आढळली, तर न्यायालयाने कोणतीही दिरंगाई न करता तिला कायद्यानुसार कठोर शिक्षा द्यावी. एक वडील म्हणून यापेक्षा अधिक काही मी बोलू शकत नाही,” असे ते म्हणाले. भावनांच्या भरात त्यांनी आणखी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देताना म्हटले, “जर ती दोषी ठरली, तर ज्या ठिकाणी केतनला ढकलण्यात आले, त्याच ठिकाणी तिलाही नेऊन ढकलावे. तिला मृत्युदंडाची शिक्षा झाली तरी माझी हरकत नाही.” मात्र, त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपल्याला मुलगी दोषी असल्यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे स्पष्ट केले.

सियाची आई पूजा गोयल यांनीही सांगितले की, सिया आणि केतन यांच्या नात्यात कोणताही वाद असल्याची कल्पना कुटुंबाला कधीच आली नव्हती. “दोघे नियमित व्हिडिओ कॉलवर बोलायचे, एकमेकांना भेटायचे आणि आनंदी दिसायचे. केतन आमच्या घरीही येत होता. त्यांच्यात काही मतभेद आहेत, असे कधी जाणवलेच नाही,” असे त्यांनी सांगितले. सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते, हा दावा त्यांनी फेटाळून लावला. “लग्नाआधी बाली येथे जाण्याची योजना होती. त्या ट्रिपसाठी आणि लग्नाच्या तयारीसाठी आम्ही जवळपास ५० हजार रुपयांची खरेदी केली होती. जर सियाला लग्नच करायचे नव्हते, तर आम्ही एवढी तयारी का केली असती?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पूजा गोयल यांनी सांगितले की, केतन हा त्यांच्या कुटुंबातील सदस्यासारखाच होता. त्याच्या मृत्यूमुळे आमचे आणि त्याच्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आम्ही लग्नाच्या तयारीत व्यस्त होतो. आजही जे घडले त्यावर आमचा विश्वास बसत नाही, असे त्यांनी भावुक होत सांगितले.

केतनच्या वडिलांनी केलेला आरोप, की सियाच्या कुटुंबाने काही गोष्टी लपवल्या होत्या, हाही आरोप प्रवीण गोयल यांनी फेटाळून लावला. सियाचे अन्य कोणाशी प्रेमसंबंध आहेत किंवा लग्नाबाबत ती नाराज आहे, याची कोणतीही माहिती कुटुंबाला नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. “सिया अत्यंत साधी मुलगी होती आणि होणाऱ्या लग्नाबाबत नेहमी आनंदी असायची, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

स्टेट बँक घोटाळाप्रकरणी श्रीकांत भसींच्या विमा पॉलिसी जप्त

महिलेच्या कारमध्ये घुसून, चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न

ऍपलचा दणका! मॅकबुक, आयपॅडच्या किंमतीत १ लाख रुपयांपर्यंत वाढ

आम्ही युद्धात नव्हतो! अमेरिका-इराण संघर्षावरून मेलोनींनी नाटोला सुनावले

प्रकरण काय?

पोलिसांच्या तपासानुसार, सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल याच्या हत्येचा कट रचला. सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, केतनने साखरपुडा मोडण्यास नकार दिल्यानंतर आणि कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने लग्नाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा कट रचण्यात आला.

तपासात असेही समोर आले आहे की, केतनला ठार मारण्याचे यापूर्वी काही प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर १८ जून रोजी त्याला पुण्याजवळील लोहगड किल्ल्यावर फिरायला नेण्यात आले. तेथे संधी साधून त्याला दरीत ढकलण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांनाही अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पोलिसांकडून या हत्येप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version