भारत सरकार आणि संरक्षण दल देशाच्या सुरक्षेला अधिक भक्कम करण्यासाठी शत्रूच्या ड्रोन हल्ल्यांविरोधात एक स्वतंत्र आणि विशेष व्यवस्था उभारत आहेत. या जॉइंट काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टम (CUAS) असे नाव देण्यात आले आहे. ही यंत्रणा पारंपरिक हवाई संरक्षण व्यवस्थेपेक्षा वेगळी असून तिचा मुख्य उद्देश ड्रोनच्या हालचालींचा वेळेवर शोध घेणे आणि त्यांचा प्रभावीपणे प्रतिकार करणे हा आहे.
यामध्ये भारतीय पायदल, वायूसेना आणि नौदलाकडील सर्व ड्रोनविरोधी साधने एकत्रित केली जाणार आहेत. ही सर्व साधने संयुक्त हवाई संरक्षण केंद्रांच्या माध्यमातून परस्पर जोडली जातील. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रोनचा वेळीच माग काढता येईल आणि संभाव्य धोक्यांवर तात्काळ कारवाई शक्य होईल.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींशी आपले चांगले संबंध !
आयएनएसव्ही कौंडिण्य: भारताच्या प्राचीन सागरी सफरीचे पुनरुज्जीवन
अमेरिका–चीन तणाव वाढला, व्हेनेझुएलावरून वाद
दहशतवादी कारवायांत सामील असणाऱ्यांना दिलासा नाहीच
सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही नवी यंत्रणा विद्यमान हवाई संरक्षण व्यवस्थेपेक्षा स्वतंत्र आहे. कारण लहान आकाराचे ड्रोन आणि मानवरहित हवाई साधनांवर लक्ष ठेवण्याचा अतिरिक्त भार मुख्य हवाई संरक्षण व्यवस्थेवर पडत होता. त्यामुळे अशा धोक्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली.
ही योजना भारताच्या व्यापक हवाई संरक्षण धोरणाचा भाग असून देशाच्या संरक्षण कवचाला अधिक सक्षम करण्याचा उद्देश आहे. मागील काही वर्षांत तीनही सेनेने विविध ड्रोनविरोधी साधने खरेदी केली असून, आता त्यांचा समन्वय साधणे गरजेचे झाले आहे.
विशेषतः पाकिस्तानकडून ड्रोन वापरण्याचे प्रयत्न रोखताना मिळालेल्या अनुभवामुळे अशा संरक्षण जाळ्याची गरज अधिक स्पष्ट झाली आहे. या नव्या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांचे संरक्षण अधिक प्रभावी होणार आहे.







