आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेत देशाचे लक्ष लागून राहिलेल्या भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्सनी दणदणीत मात करत मोठ्या विजयाची नोंद केली. प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याचा जो निश्चय भारताने केला आहे, त्याचे उदाहरण भारताने घालून दिले.
पहलगाम येथे २६ भारतीयांची निर्घृण हत्या पाहता आपण पाकिस्तानशी क्रिकेट खेळता कामा नये अशी विरोधकांची भूमिका होती. त्यानुसार माझे कुंकू, माझा देश हे आंदोलन उबाठा गटाने घेतले. पण रविवारी देशात हा सामना पाहिला गेला आणि त्यात भारताने पाकवर मात केल्यामुळे या आंदोलनातली हवाच निघून गेली.
या स्पर्धेच्या अ गटातील रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या लढतीत पाकिस्तानने दिलेले १२७ धावांचे लक्ष्य भारताने ३ बाद १३१ धावा करत सहज पार केले. कर्णधार सुर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला. विशेष म्हणजे रविवारी सुर्यकुमारचा वाढदिवस असताना त्याने ही वाढदिवसाची भेट आपल्या खेळातून दिली. त्याला फिरकीपटू कुलदीप यादव, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा यांनीही तोलामोलाची साथ दिली.
भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. दोन गडी झटपट बाद झाले होते, पण अभिषेक शर्माने केवळ ३१ धावांच्या केलेल्या झटपट खेळीमुळे पायाभरणी झाली. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (४७ धावा) आणि तिलक वर्मा (३१ धावा) यांनी स्थिरता आणत भारताला सहज विजय मिळवून दिला. पाकिस्तानकडून साईम अय्यूब हा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला, त्याने ३ बळी घेतले.
भारताचे सुपर-४ तिकिट जवळजवळ निश्चित
या विजयासह भारत आशिया कपमध्ये सलग दोन सामने जिंकणारा एकमेव संघ ठरला आहे. त्यामुळे सुपर-४ फेरीत भारताचा प्रवेश जवळजवळ निश्चित झाला आहे. शुक्रवारी भारत ओमानविरुद्ध आपला शेवटचा गट सामना खेळेल.
पाकिस्तानची पुढील परीक्षा
पाकिस्तानने पुढील सामन्यात यूएईचा सामना करायचा आहे. तो सामना त्यांनी जिंकण्याची अपेक्षा आहे. तसे झाल्यास पुन्हा एकदा पुढील रविवारी भारत-पाक सामना रंगण्याची शक्यता आहे.
भारतीय फिरकीची कमाल
पहिल्या डावात भारतीय फिरकीपटूंनी पाकिस्तानला अक्षरशः गुंडाळून टाकले.
- कुलदीप यादव (३/१८, ४ षटके)
- अक्षर पटेल (२/१८, ४ षटके)
- वरुण चक्रवर्ती (१/२४, ४ षटके)
या तिघांनी मिळून तब्बल ४० चेंडू धावांविना टाकले. याशिवाय जसप्रीत बुमराहने आणखी १५ डॉट बॉल टाकले. अशा परिस्थितीत पाकिस्तानी फलंदाजांना धावा काढणे जवळजवळ अशक्य झाले.
शाहीद आफ्रिदीची झुंज
फक्त शाहीन शाह आफ्रिदीने (१६ चेंडूत नाबाद ३३ धावा) झटपट फटकेबाजी करत पाकिस्तानचा डाव १२५ धावांच्या वर नेला. अन्यथा त्यांचा डाव शंभर धावांच्या आतच संपला असता.
हे ही वाचा:
लहान-सहान गोष्टी विसरायला लागला आहात?
राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी स्वीकारणार
आर.जी. कर मेडिकल प्रकरण : आरोपी मंगेतर मालदात अटक
सामन्याच्या पहिल्याच षटकात हार्दिक पांड्याने साईम अय्यूबला (०) बाद केले. लगेचच जसप्रीत बुमराहने मागील सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या मोहम्मद हॅरिसला (३) पॅव्हेलियनमध्ये धाडले.
साहिबजादा फर्हान (४४ चेंडूत ४० धावा) थोडा वेळ टिकला, पण भारतीय फिरकीसमोर पूर्णपणे झुंज देताना दिसला नाही. फखर जमन (१५ चेंडूत १७ धावा) नेहमीप्रमाणे अक्षर पटेलवर आक्रमक झाला, पण तिलक वर्माकडे झेल देऊन बाद झाला.
कर्णधार सलमान अली आघा (१२ चेंडूत ३ धावा) आणि हसन नवाज यांनी धावा काढण्यासाठी धोकादायक फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय फिरकीच्या लांबी व उसळीचा अंदाज घेण्यात ते अपयशी ठरले.
कुलदीप यादवच्या गुगलीवर मोहम्मद नवाज बाद झाला, तर फर्हानही मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अशा प्रकारे पाकिस्तानी फलंदाजांची भारतीय फिरकीसमोर पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी झाली.







