अहमदाबाद विमान अपघातावर भारतीय क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे. आज गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान (ए-१७१) कोसळले. हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते, पण अवघ्या २ मिनिटांतच विमान कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा समावेश होता.
हा विमान अपघात संपूर्ण देशासाठी दुःखद आहे. आता भारतीय क्रिकेटपटूही सोशल मीडियावर पोस्ट करून आपले दुःख व्यक्त करत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, शिखर धवन यांनीही या अपघातावर दुःख व्यक्त केले आहे. यासोबतच अजिंक्य रहाणेनेही इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करून या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
क्रिकेटपटू रोहित शर्माने लिहिले की, ‘अहमदाबादहून आलेली बातमी खूप दुःखद आणि धक्कादायक आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मी प्रार्थना करतो.’ भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या अपघाताबद्दल ऐकून मला धक्का बसला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. अपघाताजवळील परिसरात राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेसाठीही मी प्रार्थना करतो.’
हरभजन सिंग यांनी लिहिले की, ‘अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या दुःखद बातमीने मला खूप धक्का बसला आहे आणि दु:ख झाले आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडितांसोबत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांना अकल्पनीय वेदना आणि नुकसान सहन करावे लागत आहे. अशा क्षणी शब्द अपुरे पडतात पण मला आशा आहे की प्रभावित झालेल्यांना शक्ती, धैर्य आणि आधार मिळेल. या दुर्घटनेत प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना.’
हे ही वाचा :
विमान अपघात : एअर इंडियाचे सोशल मीडिया हँडल्स, वेबसाईट ‘ब्लॅक’
दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही, फोटो आला समोर!
अहमदाबाद विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशन्स स्थगित
इरफान पठाणने लिहिले की, ‘आज अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने खूप दुःख झाले आहे. प्रवासी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो’. अजिंक्य रहाणे यांनी लिहिले की, ‘अहमदाबादमधील दुःखद विमान अपघाताने खूप दुःख झाले आहे. पीडितांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करतो’. अफगाणिस्तानचा लेगस्पिनर रशीद खाननेही भारतातील या दुःखद घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, विमानात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी १६९ भारतीय नागरिक आहेत. यामध्ये ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत.







