टी-२० मालिकेत ३-२ असा विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आता इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. या मालिकेचा पहिला सामना मंगळवारी साउथॅम्प्टन येथे सायंकाळी ५.३० वाजता खेळवला जाणार आहे.
सद्यस्थितीत भारतीय महिला संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यावर्षी खेळलेल्या ८ वनडे सामन्यांपैकी ७ सामन्यांत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध ३-० असा क्लीन स्वीप केला होता, त्यानंतर श्रीलंका व दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्रिकोणीय मालिका जिंकत दमदार प्रदर्शन कायम ठेवलं आहे.
ही मालिका आगामी महिला वनडे विश्वचषक २०२५ च्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ३० सप्टेंबर २०२५ पासून भारतात होणाऱ्या या स्पर्धेतील काही सामने श्रीलंकेत देखील होणार आहेत. त्यामुळे ही वनडे मालिका दोन्ही संघांसाठी वर्ल्ड कप पूर्वतयारीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
भारतीय संघात अनुभवी व नवोदित खेळाडूंचा समतोल पाहायला मिळत आहे. युवा सलामीवीर प्रतिका रावल हिला शेफाली वर्मा ऐवजी संघात संधी देण्यात आली असून, तिने त्रिकोणीय मालिकेत सर्वात वेगाने ५०० धावा पूर्ण करत चांगली छाप पाडली आहे.
स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, जेमिमा रोड्रिग्ज, ऋचा घोष यांच्या नेतृत्वाखाली भारताची फलंदाजी सशक्त वाटते, तर स्नेह राणा, श्री चरणी, क्रांती गौड व अरुंधती रेड्डी यांच्यासारख्या गोलंदाजांकडून भेदक माऱ्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, इंग्लंडच्या संघात दुखापतीनंतर परतलेल्या कर्णधार नॅट सिव्हर-ब्रंट व प्रमुख फिरकीपटू सोफी एक्लेस्टोन यांची उपस्थिती संघाला बळ देणारी आहे.
भारत आणि इंग्लंड महिला संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या ७६ वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडने ४० तर भारताने ३४ सामने जिंकले आहेत. २ सामने अनिर्णीत राहिले.
हेही वाचा:
किंग चार्ल्सनी लॉर्ड्स टेस्ट पाहून दिले सरप्राईज
सीरियाकडून इस्रायली हवाई हल्ल्याची निंदा
🔹 संभाव्य संघ:
भारत: प्रतिका रावल, स्मृती मंधाना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रोड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, श्री चरणी, सयाली सतघरे, यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, अरुंधती रेड्डी, राधा यादव.
इंग्लंड: टॅमी ब्युमोंट, एमी जोन्स (यष्टीरक्षक), एम्मा लॅम्ब, नॅट सिव्हर-ब्रंट (कर्णधार), सोफिया डंकली, एलिस कॅप्सी, एलिस डेव्हिडसन रिचर्ड्स, केट क्रॉस, लिन्से स्मिथ, लॉरेन बेल, लॉरेन फायलर, चार्ली डीन, माया बाउचियर, एम अर्लॉट, सोफी एक्लेस्टोन.







