ईशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंडने गुरुवारी पुण्यात झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणाचा पराभव करून सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली. झारखंडने पहिल्यांदाच ही प्रतिष्ठेची ट्रॉफी आपल्या नावे केली असून राज्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. राजधानी रांचीला परतल्यानंतर चॅम्पियन कर्णधार ईशान किशनचे चाहत्यांनी भव्य स्वागत केले.
या वेळी माध्यमांशी बोलताना ईशान किशन म्हणाला, “आमच्या संघाने खूप चांगला खेळ केला. खूप आनंद झाला आहे. लवकरच आणखी सामने आहेत आणि आम्ही जिंकतच राहू. सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.”
झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजय नाथ शाह देव यांनी संघासाठी २ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करत झारखंडने २६२ धावा केल्या. कर्णधार ईशान किशनने ४९ चेंडूत १०१ धावांची शानदार खेळी साकारली. प्रत्युत्तरात हरियाणा संघ १९३ धावांवर बाद झाला आणि ६९ धावांनी सामना गमावला. ईशान किशनला ‘सामनावीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संपूर्ण स्पर्धेत कर्णधार आणि फलंदाज म्हणून ईशान किशनची कामगिरी अत्यंत प्रभावी ठरली. १० सामन्यांच्या १० डावांत २ शतके आणि २ अर्धशतके झळकावत १९७.३२ च्या स्ट्राइक रेटने ५१७ धावा करत तो स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ११३ अशी होती.
या दमदार कामगिरीनंतर ईशान किशनच्या भारतीय संघात पुनरागमनाच्या आशा वाढल्या आहेत. मात्र, त्याने सातत्यपूर्ण कामगिरीलाच यशाचे मुख्य सूत्र मानले आहे.
अंतिम सामन्यानंतर ईशान म्हणाला होता, “मी चांगली कामगिरी करत होतो, तरीही भारतीय संघात निवड झाली नाही, तेव्हा खूप वाईट वाटले. मला वाटले की अजून मेहनत करावी लागेल. संघाला विजय मिळवून द्यायचा आहे. निराशा मागे नेते, त्यामुळे मेहनत सुरू ठेवणे आणि स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. माझे काम फक्त चांगली कामगिरी करत राहणे आहे.”
डावखुरा आक्रमक यष्टीरक्षक-फलंदाज ईशान किशन २०२४ च्या सुरुवातीपासून भारतीय संघाबाहेर आहे.







