राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हरियाणा आणि गोवा या राज्यांमध्ये नवीन राज्यपाल नियुक्त केले आहेत. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्येही ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा (सेवानिवृत्त) यांच्या जागी नवीन उपराज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, प्रोफेसर असीम घोष यांची हरियाणाचे राज्यपाल, तर ज्येष्ठ राजकारणी आणि माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुसापति अशोक गजपति राजू यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांना लडाखचे उपराज्यपाल म्हणून नेमण्यात आले आहे.
या नियुक्त्या संबंधित व्यक्तींनी आपापले पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू होतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी लडाखचे सध्याचे उपराज्यपाल ब्रिगेडियर बी.डी. मिश्रा (सेवानिवृत्त) यांचे राजीनामा स्वीकारला असून, त्यांच्या जागी कविंदर गुप्ता हे पदभार स्वीकारतील. कविंदर गुप्ता हे भाजपचे प्रमुख नेते असून त्यांनी महबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी-भाजप आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली होती. त्याआधी ते तीन वेळा जम्मूचे महापौर होते. २ डिसेंबर १९५९ रोजी जन्मलेले कविंदर गुप्ता हे आरएसएसचे सदस्य असून ते १३ व्या वर्षी संघाशी जोडले गेले होते.
हेही वाचा..
उद्धव ठाकरे-संजय राऊत यांची आगामी मुलाखत महाराष्ट्रासाठी कॉमेडी शो
निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी सरकार फारसं काही करू शकत नाही
अरेरे… पाकिस्तानमध्ये नालेही साफ नाहीत
प्रोफेसर असीम घोष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व राजकारणी, हे भाजपच्या पश्चिम बंगाल युनिटचे माजी अध्यक्ष होते. राजकीय विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले असीम घोष १९९१ मध्ये भाजपमध्ये सामील झाले. २००३ मध्ये त्यांना त्रिपुरासाठी पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. २६ जून १९५१ रोजी चेन्नई येथे जन्मलेले पुसापति अशोक गजपति राजू, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री होते. याआधी ते आंध्र प्रदेश सरकारमध्ये चार वेळा मंत्री होते. २०१८ मध्ये त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य बनवण्यात आले होते.







