छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हिंदवी स्वराज्याची प्रेरणा – त्यांचे योगदान भारताच्या इतिहासातील एक तेजस्वी अध्याय आहे. पण आज काही डाव्या विचारधारेचे इतिहासकार, चित्रपट निर्माते आणि माध्यमातील काही मंडळी याच शिवरायांच्या इतिहासाचं विकृत चित्र उभं करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत.
‘खालिद का शिवाजी’ या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास विकृत करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. या चित्रपटात असा दावा करण्यात आला आहे की, छत्रपतींच्या सैन्यात ३५% मुस्लिम सैनिक होते, रायगडावर त्यांनी मशिदीची स्थापना केली होती आणि त्यांच्या अंगरक्षकांमध्ये ११ मुस्लिम होते.
हे केवळ खोटं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची जाणीवपूर्वक झालेली विटंबना आहे – एक ठरवून आखलेला ‘हल्ला’.
या पेक्षा वाईट गोष्ट म्हणजे राज मोरे यांनी दिग्दर्शित केलेला हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट यंदाच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ‘Marché du Film’ या प्रतिष्ठित विभागासाठी निवडला गेला आहे.
गेल्या काही वर्षांपासून, छत्रपती शिवाजी महाराजांना ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) राजा म्हणून सादर करण्याचा एक सुनियोजित प्रयत्न चालू आहे. काही विशिष्ट विचारधारेचे लोक – विशेष करून डाव्या विचारांचे इतिहासकार, इस्लामिस्ट, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे जातीयवादी – इतिहासाचे विकृतीकरण करून महाराजांची प्रतिमा आपल्या सोयीनुसार वापरण्याचा घाट घालत आहेत. याच विकृत मानसिकतेतून ‘खालिद का शिवाजी’ नावाच्या एका वादग्रस्त चित्रपटाची निर्मिती झाल्याचे समोर आले आहे. या चित्रपटाने केवळ चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही मोठा वाद निर्माण केला आहे.
‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट शिवाजी महाराजांचा शोध घेणाऱ्या मुस्लिम मुलाच्या कथानकावर आधारित आहे, हे ऐकायला निष्पाप वाटत असलं तरी प्रत्यक्षात हा चित्रपट एक जहाल प्रोपोगंडा आहे, ज्यात महाराजांना एका विशिष्ट धर्माच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न होतो. हे धोरण नवं नाही — गेल्या काही वर्षांत डाव्या आणि उदारमतवादी वर्तुळांनी सातत्याने शिवरायांचा इतिहास विकृत करून त्यांना ‘धर्मनिरपेक्ष’ किंवा ‘इस्लामनिष्ठ’ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘कर्तव्य भवन’चे उद्घाटन
ग्वाल्हेरमध्ये दुपारीच दारू व्यापाऱ्याची ३० लाखांची लूट
ट्रेनमधील ११,५३५ डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे
विदिशामध्ये १० ऑगस्ट रोजी बीईएमएलच्या रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन
या चित्रपटाच्या ट्रेलरमधून जे काही दाखवले जात आहे, ते पाहून प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाला धक्का बसला आहे. महाराजांच्या इतिहासाशी ही उघड-उघड केलेली छेडछाड आहे. या चित्रपटात काही अत्यंत आक्षेपार्ह आणि निराधार दावे करण्यात आले आहेत:
शिवाजी महाराजांच्या सैन्यात ३५% मुस्लिम सैनिक होते: हा दावा पूर्णपणे खोटा आहे. अनेक इतिहासकार, आणि अस्सल ऐतिहासिक बखरी आणि दस्तऐवजांनुसार, महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक होते, पण त्यांची संख्या ३५% इतकी प्रचंड नव्हती. हा आकडा जाणीवपूर्वक वाढवून सांगण्यात आला आहे.
महाराजांनी रायगडावर मशीद बांधली: हा आणखी एक निराधार आणि धादांत खोटा दावा आहे. रायगडावर कोणतीही मशीद नव्हती. उलट, महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड निवडला आणि तेथे भव्य मंदिरांची निर्मिती केली.
जगदीश्वर मंदिराच्या भिंतींवर एक शिलालेख आहे, ज्यामध्ये लिहिले आहे – ‘शिवछत्रपतींच्या आज्ञेने, मी (हिरोजी इंदूलकर) विहिरी, तलाव, सरोवरे, बागा, बाजारपेठा, स्तंभ, अश्वशाळा आणि मंदिरे बांधली आहेत’. या संपूर्ण नोंदीत कुठेही मशीदीचा उल्लेख नाही.
काही इतिहासकारांनी असा दावाही केला आहे की जगदीश्वर मंदिराचा शिखर हा इस्लामी स्थापत्यशैलीत बांधलेल्या घुमटासारखा आहे, ‘कारण शिवाजी महाराज सूफी संत आणि इस्लामी विद्वानांच्या प्रभावाखाली होते’. पण हा दावा अत्यंत आधारहीन आणि खोटा आहे.
महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये ११ मुस्लिम अंगरक्षक होते: हा दावाही चुकीचा आहे. महाराजांचे अंगरक्षक हे त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या मराठा मावळ्यांच्या निवडक तुकडीतून होते. त्यांची नावे इतिहासात नोंद आहेत. सभासद बखर आणि शिवभारत यासारख्या इतिहासस्रोतांमध्ये अफजलखान भेटीवेळी महाराजांसोबत असलेल्या १० अंगरक्षकांची नावे दिली आहेत. त्यामध्ये सिद्दी इब्राहिम नावाचा एक मुस्लिम होता, पण इतर सर्व मावळे होते. हे सर्व मावळ प्रदेशातील निष्ठावान, चपळ, शूर मराठे होते – ही निवड जात, धर्म न पाहता केवळ निष्ठेच्या आधारे केली जात असे. ११ मुस्लिम अंगरक्षक’ असा दावा अलीकडील सार्वजनिक चर्चांमध्ये आणि सोशल मीडियावर समोर येत आहे, परंतु याला कोणताही प्राथमिक ऐतिहासिक आधार नाही. प्रतिष्ठित इतिहासतज्ज्ञांचे मत आहे की अशा कथा शिवाजी महाराजांच्या सैन्य आणि अंतर्गत प्रशासनाच्या रचनेचे विकृतीकरण करतात.
या सर्व खोट्या दाव्यांच्या मागे एकच उद्देश स्पष्ट दिसतो: छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ मुस्लिमांचे कैवारी म्हणून दाखवून त्यांच्या मूळ हिंदुत्ववादी भूमिकेला कमी लेखणे. महाराजांनी सर्वधर्मीयांचा आदर केला, पण त्यांच्या राज्याची स्थापना हिंदुत्व रक्षणासाठी झाली होती, हे वास्तव कोणीही नाकारू शकत नाही. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी काय केले, हे जगजाहीर आहे. हिंदू मंदिरांचे रक्षण करणे, हिंदू धर्माला सन्मान देणे हे त्यांच्या राजकारणाचे केंद्र होते.
आज काही लोक महाराजांना ‘सेक्युलर’ ठरवून त्यांच्या संघर्षाला आणि शौर्याला ‘धर्मनिरपेक्षतेच्या’ चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हे आपण विसरता कामा नये. ‘हिंदवी स्वराज्य’ म्हणजे काय, याचा अर्थ काय होता, हे समजून घेणे आवश्यक आहे. ते फक्त एका भौगोलिक प्रदेशाचे राज्य नव्हते, तर ते हिंदू संस्कृती, धर्म आणि मूल्यांवर आधारित एक आत्मनिर्भर राज्य होते. हे सर्व खोटारडे दावे ‘डाव्या’ (leftist) विचारधारेच्या काही इतिहासकारांनी जाणीवपूर्वक पसरवले आहेत, ज्यांना खरेतर मराठा इतिहासाची फारशी माहिती नाही. अस्सल मराठी इतिहासकारांच्या कामाकडे ते ‘ब्राह्मणी इतिहास’ म्हणून दुर्लक्ष करतात आणि आपल्या सोयीचा खोटा इतिहास रचतात. या चित्रपटाचे निर्मातेही त्याच विकृत विचारधारेचा भाग असल्याचे स्पष्ट दिसते.
या चित्रपटावर हिंदू संघटनांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. सेन्सॉर बोर्डाकडे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे आणि निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आली आहे. ‘हिंदू महासंघा’ने तर “जर हा चित्रपट प्रदर्शित झाला, तर अफजलच्या वधावर व्याख्यान देऊ” असा इशारा दिला आहे. यावरून या वादाची गंभीरता लक्षात येते.
या प्रकारच्या चित्रपटांमुळे समाजातील सलोख्याला धक्का पोहोचू शकतो, धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे सरकारने आणि सेन्सॉर बोर्डाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आणि भारताचे दैवत आहेत. त्यांच्यावर बनवलेला कोणताही चित्रपट ऐतिहासिक सत्यावर आधारित असावा, हे प्रत्येक भारतीयाची अपेक्षा आहे.
दुर्दैवाने, भांडूप पोलीस ठाण्याने ‘खालिद का शिवाजी’ या खोटा इतिहास पसरवणाऱ्या आणि हिंदूंच्या मनात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चित्रपटाविरोधात सोशल मीडियावर निषेध व्यक्त केल्याबद्दल हिंदुत्व कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली आहे.







