इंग्लंडच्या भूमीवर १००० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या खास यादीत आता के. एल. राहुल याचं नावही सामील झालं आहे. मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत त्याने हे विक्रमी यश गाठलं.
राहुलने इंग्लंडमध्ये आतापर्यंत १३ कसोटी सामने खेळले आहेत. २५ डावांमध्ये त्याने ४१.४० च्या सरासरीने एकूण १०३५ धावा केल्या आहेत.
राहुलपूर्वी ही कामगिरी सचिन तेंडुलकर (१५७५ धावा), राहुल द्रविड (१३७६), सुनील गावसकर (११५२) आणि विराट कोहली (१०९६) यांनी केली होती. आता राहुलही त्या दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे.
या कसोटी मालिकेत राहुलने ७ डावांमध्ये ६०.१४ च्या सरासरीने ४२१ धावा केल्या आहेत. या दौऱ्यात त्याचा स्ट्राईक रेट ५४.८२ असून त्याने आतापर्यंत ५९ चौकार ठोकले आहेत.
मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने ८३ षटकांत २६४ धावा करताना ४ विकेट गमावल्या.
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना के. एल. राहुल आणि यशस्वी जायसवाल यांनी ९४ धावांची भागीदारी करत दमदार सुरुवात केली. राहुलने ९८ चेंडूंमध्ये ४ चौकारांसह ४६ धावा केल्या. तर जायसवालने १०७ चेंडूंमध्ये १ षटकार व १० चौकारांसह ५८ धावा केल्या.
शुभमन गिल १२ धावा काढून पगबाधा बाद झाला. भारताचा स्कोर १४० पर्यंत पोहचेपर्यंत तीन फलंदाज तंबूत परतले होते. यानंतर साई सुदर्शन ने संयमी खेळी करत भारताला २०० पार नेलं. त्याने १५१ चेंडूंमध्ये ७ चौकारांसह ६१ धावा केल्या.
विकेटकीपर ऋषभ पंत ३७ धावांवर असताना रिटायर्ड हर्ट झाला. क्रिस वोक्स च्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप करताना त्याच्या पायाला दुखापत झाली.
दिवसाखेर रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी १९ धावांवर नाबाद आहेत.
इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने २ बळी घेतले असून क्रिस वोक्स आणि लियाम डॉसन यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली आहे.
भारत सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-२ ने पिछाडीवर आहे. त्यामुळे ही मालिका जिंकण्यासाठी भारताला उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे.







